औरंगाबाद: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर एमआयएमने वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी औरंगाबादेत ही घोषणा केली. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. जागावाटपात सन्मान न ठेवल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएमच्या आघाडीने भल्याभल्यांना घाम फोडला होता. इतकेच नव्हे तर औरंगाबाद मतदारसंघातही एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता. या आघाडीने राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीची धुळधाण उडवली होती. त्यामुळे अशोक चव्हाण, सुशीकुमार शिंदे, चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 


त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम काय कमाल करणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, जागवाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये सुरुवातीपासूनच धुसफूस सुरु होती. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीला सुरुवातीला १०० जागांची मागणी केली होती. यानंतर एमआयएमच ७५ आणि शेवटी ५० जागांवरही लढायची तयारी दर्शविली होती. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी या सगळ्याच मागण्यांना केराची टोपली दाखवली. प्रकाश आंबेडकर एमआयएमला फक्त आठ जागा द्यायला तयार होते. 


चंद्रकांत खैरे-इम्तियाज जलील यांच्यातील 'किस्सा कुर्सी का' मिटता मिटेना...


मात्र, एमआयएमने गेल्या विधानसभा निवडणुकीत २४ जागा लढवल्या होत्या. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव मान्य नसल्याचे एमआयएमने सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. सरतेशेवटी या वादाची परिणीती वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती तुटण्यात झाली आहे.