धुळे : भाजपवर आरोप करणाऱ्या आमदार अनिल गोटे यांनी चार बोटे आपल्याकडे असतात हे विसरू नये, असा टोला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार गोटेंना लगावला. धुळे महापालिका रणसंग्रामात भाजपच्या प्रचारासाठी महाजन मैदानात उतरलेत. त्यामुळे गोटे विरुद्ध महाजन असा खरा सामना रंगणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार फार दखलपात्र आहेत, असं आपल्याला वाटत नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन 'झी २४ तास'शी बोलताना स्पष्ट केले आहे. महाजन आणि भाजपवर टोकाची टीका करणाऱ्या आमदार अनिल गोटे आणि अन्य विरोधकांचा महाजन यांनी आपल्याच शैलीत समाचार घेतला आहे.


महाजन यांनी भाजपवर आरोप करणाऱ्यांचे सर्व आरोप खोडून काढत, आमदार गोटेंची दखल घेण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे विरोधकांनी स्वतःची मतदान यंत्र आणावीत. त्या आम्ही एकदा तपासू आणि त्या मतदान यंत्रांवर आयोगाने मतदान घ्यावे, त्यातही भाजपचाच विजय होईल असा दावा करत, विरोधाकांना आव्हान दिले आहे. 


बंडखोर आमदार अनिल गोटे यांची दखल घेण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करताना विरोधक पराभवाला घाबरून मतदान यंत्राबाबत आरोप करत आहेत, असे ते म्हणालेत. धुळे महापालिका निवडणुकीत भाजप प्रभारी असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात भाजपचा विकासाचा अजेंडा असून, बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.