किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, हसन मुश्रीफ यांचा पलटवार
चंद्रकांत पाटील यांनी बांधकाम विभाग आणि महसूलमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी FIR दाखल करणार
मुंबई : ठाकरे सरकारच्या डर्टी 11 मधील राखीव खेळाडूंची यादी दुर्दैवाने वाढत चालली आहे. असे म्हणत भाजप नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्य सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर गंभीर आरोप केले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केला असून, त्याबाबत 2700 पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.
मुश्रीफ यांची तातडीची पत्रकार परिषद
किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना आात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर केला जात असून आपल्या पक्षाविरुद्ध आणि शरद पवारांविरोधात (Sharad Pawar) आरोप केले जात आहेत, हे आरोप बिनबुडाचे खोटे असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आपल्यावरचे आरोप फेटाळले.
सोमय्या यांच्या आरोपाचा तीव्र निषेध
किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. याचा आपण तीव्र निषेध करतो, सोमय्या यांच्या सीए पदवीबद्दलच शंका यायला लागली आहे. सोमय्या यांनी आज जी कागदपत्र दाखवली ती अधिकृत साईटवर अनेक वर्षांपासून उपलब्ध आहेत. आम्ही ती अपलोड करतोय, जर खोटं असतं आम्ही लपवू शकलो असतो, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
सोमय्या यांना काहीही माहित नसावं
निवडणुकीमध्ये आपण अॅफिडेव्हिट देत असतो त्याची कागदपत्रही उपलब्ध असतात. त्यामुळे नव्याने काहीतरी आरोप केल्याचं दाखवण्यात आलं आहे ते बिनबु़डाचे आहेत. निवडणुकीआधी दोन वर्षांपूर्वी आपल्या कारखान्यावर आणि घरावर धाडी टाकण्यात आल्या, पण त्यात त्यांना काहीही मिळालं नाही. आणि आता किरीट सोमय्या उठून हि बेनामी संतप्ती आहे, मनि लॉण्ड्रींग आहे असं म्हणत आहेत, हा शोध सोमय्या यांनी कुठून लावला. किरीट सोमय्या यांना काहीही माहिती नसावं, याबाबत त्यांनी कोल्हापूर, कागलमध्ये येऊन माहिती घ्यायला हवी होती, मग त्यांना कळलं असतं खरं काय आणि खोटं काय, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे यांनी माहिती दिली असेल. सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन खातरजमा करायला हवी होती.
सोमय्यांवर अब्रुनुकसानीचा दावा
राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आपली प्रतिमा तयार करण्यासाठी अनेक वर्ष घालवावी लागतात. आणि ही प्रतिमा डागळ्यासाठी कोणीही यावं आणि आरोप करावेत. याआधीही आपल्यावर आरोप झाले तेव्हा आपण अब्रुनुकसानीचे दावे केले आहेत. आपल्यावर एकाही घोटाळ्याचा आरोप नाही. म्हणूनच आपण येत्या दोन आठवड्यामध्ये किरीट सोमय्या यांच्यावर फौजदारी अब्रुनुकसानीचा 100 कोटींची दावा कोल्हापूरच्या सेशन कोर्टात करणार आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्टाचार केला
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी हायब्रीड अन्यूईटी बांधकामामध्ये जो भ्रष्टाचार केला आहे, त्याविरुद्ध कायदेशीर सल्ला घेऊन एफआयआर दाखल करणार आहे, समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू, असा इशाराही हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. अमित शहा यांच्या मैत्रीमुळेच चंद्रकांतदादांना पद मिळालं. त्यांना सामाजिक काम करता येत नाही. त्यांना कोल्हापूर सोडून पुण्याला जावं लागलं, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.
किरीट सोमय्या यांचे आरोप
CRN SYSTEM PVT LTD या कंपनीकडून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद यांनी दोन कोटींचे कर्ज घेतले आहे. ही कंपनी पूर्णतः बनावट असून 2017 मध्ये तिच्यावर प्रतिबंध आले होते. या शिवाय मुश्रीफ परिवाराविरोधात दोघांविरोधात 127 कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. असेही सोमय्या यांनी म्हटले.
सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना लिमिटेडबाबत निवडणुक प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे. परंतु या कारखान्यात मुश्रीफ आणि परिवाराने 100 कोटीहून अधिक भ्रष्ट्राचाराचा पैसा पार्क केला आहे. असा घणाघाती आरोप सोमय्या यांनी केला आहे. हे सर्व पुरावे घेऊन उद्या आम्ही मुंबई ED कडे तक्रार दाखल करणार आहोत. असेही त्यांनी म्हटले आहे.