मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड अडचणीत सापडले आहेत. राठोड यांनी अधिवेशनापूर्वी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे. वनमंत्री संजय राठोड आज मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे इथे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वन मंत्री संजय राठोड हे आज वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे पोहोचणार असल्याची चर्चा आहे. पोहोरादेवी इथे ते आपल्या मंत्रीपदासोबतच आमदार पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती पोहरादेवी इथले महंत जितेंद्र महाराज यांनी फोनवर दिली.



दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राठोड यांच्या राजीनाम्याबाबत सूचक ट्वीट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कोणाचाही दबाव नाही असं त्यानी औरंगाबादमध्ये देखील बोलताना सांगितलं. 


भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर शनिवारी गंभीर आरोप केले होते. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सरकार बलात्काऱ्याला वाचवत आहे सरकार, पोलीस यांच्याकडे कोणतंही उत्तर नाही असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. तर पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मागणीही यावेळी केली होती. 


राज्याचे वादग्रस्त वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा होणार का यावर आता चर्चा तीव्र झाली आहे. अधिवेशनापूर्वी राठोड राजीनामा देतील अशी शक्यता आहे. उद्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. त्यामुळे आजच याबाबत हालचाली होण्याची शक्यता आहे. 


 राठोड आज दुपारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे या भेटीत राठोड यांचा राजीनामा होणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर प्रचंड दबाव आहे.