मुंबई : कर्जमाफी योजनेतून सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा बँकेशी संपर्क साधण्याचं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी केलंय. 


कर्जमाफीत मोठे घोळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाईन कर्जमाफी योजनेत मोठ्याप्रमाणात घोळ झाले. शेतकऱ्यांनी दिलेली माहिती आणि बँकेकडे उपलब्ध माहिती यात आलेल्या तफावतीमुळे अनेक शेतकरी योजनेपासून वंचित रहिल्याचं लक्षात आल्यावर सरकारला हे शहाणपण सुचलं. 


शेतक-यांना आवाहन


शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क करण्याचं आवाहन सुभाष देशमुखांनी केलंय. वंचित शेतकऱ्यांनी आपली माहिती थेट बँकेशी संपर्क साधून सादर करावी असं मंत्र्यांनी प्रसिद्धीद्वारे म्हटलंय. 


वंचित शेतक-यांनी हे करा


शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्जात भरलेली माहिती आणि बँकांची दिलेली माहिती जुळत नसल्याने अनेक पात्र अर्जदार शेतकरी कर्जमाफीपासून अजूनही वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांची शहानिशा करण्यासाठी आता बँकेत माहिती सादर करण्याचे सरकारचे आवाहन आहे.


शासनाची तालुकास्तरीय समिती गठित 


काही शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जात दिलेली कर्जाची माहिती ही बँकेकडून प्राप्त झालेल्या कर्ज खात्यांच्या माहितीशी जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही. अर्जदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करुन पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देता यावा म्हणून शासनाने तालुकास्तरीय समिती गठित केली आहे. अशा शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेत उपलब्ध करुन दिलेल्या आहेत व बँकांनी त्यांच्या शाखेत त्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत.


शेतक-यांनी काय करावे?


कर्जमाफी योजनेचा लाभ प्रलंबित असलेल्या अर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची अचूक माहिती आपल्या बँकेच्या शाखेत त्वरीत सादर करावी. शेतकऱ्यांसंबंधी माहितीची शहानिशा करुन त्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती बँकेमार्फत करण्यात येईल. त्यानंतर तालुकास्तरीय समिती मार्फत तपासणी अंती ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येऊन योजनेंतर्गत लाभ देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. सर्व संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.