सांगली : मिरज दंगलीतील ५१ जणांविरुद्ध असलेले गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार सुरेश खाडे यांच्यावर गुन्हे होते. जमावबंदी असूनही मोर्चा काढल्याने गुन्हे दाखल करण्यात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिरजेत २००९ मध्ये झालेल्या दंगल प्रकरणातील ५१ जणांविरोधातील गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले आहेत. गणेशोत्सवादरम्यान स्वागत कमानीवरील अफजलखान वधाच लावलेलं पोस्टर आणि पोलिस गाडीवर चढून एका तरुणाने झेंडा फडकवला. काही तरुणांनी मूर्ती फोडल्या याघटना नंतर मिरजेत दंगल उसळली होती. 


यावेळी जमावबंदी आदेशाचा भंग करून मोर्चा काढल्या प्रकरणी भाजप नेते आणि विद्यमान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार सुरेश खाडे यांच्यासह भाजप आणि शिवसेनेच्या ५१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयात दाखल असलेले खटले राज्य सरकारने आत्ता मागे घेतले आहेत.


जमावबंदी आदेशाचा भंग करुन बेकायदा जमाव जमवून मोर्चा काढल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, मकरंद देशपांडे, बजरंग पाटील यांच्यासह ५१ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
     
दंगलीतील वेगवेगळ्या घटनांप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सामील असलेल्यांविरुद्ध ५६ खटले न्यायालयात दाखल केले होते. ५६ खटल्यांमध्ये सुमारे ६५० जणांविरुद्धचा हा खटला होता. 


यामध्ये दंगल भडकविणे, जाळपोळ करणे, वाहनांचे, मालमत्तेचे नुकसान करणे इत्यादी घटनांचा समावेश होता. गेल्या काही वर्षात यापैकी १८ खटल्यांचा निकाल लागलेला आहे. मात्र अद्याप ३८ खटले सुरू आहेत.