मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत बोलताना बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत नेत्यांवर खोचक शब्दात टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येणारा पाऊस धो-धो पडताना दिसतो पण सरकारी धोरणं जे तलवार चालवतात त्याचं काय?, आम्ही सगळे मिळून कसायासारखे शेतकऱ्याला हळूहळू कापतो ते दिसत नाही. आम्ही सगळेच नालायक, आमच्याएवढं नालायक कोणीच नाही. जखम झाल्यावर त्यावर मीठ टाकणारी आपण औलाद आहोत. उगाच कशाला पावसाचं नाव बदनाम करायचं, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 


पाऊस एकदा पडून जातो मात्र सरकारची जी धोरणे आहेत त्याच्यामुळे जास्त नुकसान होत आहे. पक्षाविरोधात बोलायचं नाही, पक्षविरोधी कायदा संपून टाकला पाहिजे. पक्षांनी मक्तेदारीही सुरू केली आहे. तुमच्या भागात नुकसान झालं, कायदा आडवा येत असेल तर मी बोलू शकत नाही कारण माझ्या पक्षाचं सरकार आहे. अमेरिकेमध्ये कुठे पक्ष आहेत?, मते जनतेची आणि हुकूमशाही नेत्यांची. अतिवृष्टी झाली की आपण नुकसान भरपाई देतो किती 5 हजार, अरे जर संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं असेल तर 5 हजार रूपयांनी काय होणार?, असा सवाल करत बच्चू कडू यांनी सर्वांना फैलावर घेतलं. 


मी शेतकऱ्याच्या बाजुने बोलू की नको, मी बोललो तर माझा राग होईल पण मला परवा नाही. माझी स्वत:ची पानटपरी आहे, मला अजिबात परवा नाही चुलीत घाला ते मंत्रीपद, असं म्हणत बच्चू कडूंनी शिंदे सरकारला टोला लगावला आहे. 


दरम्यान, शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटाला बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता. मात्र शिंदे सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.