अनिरुद्ध ढवळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीवरून चांदूर बाजारला जात असताना रस्त्याच्या कडेला दोन मुलं बरबटीच्या शेंगा विक्री करत असल्याचे दिसल्यानंतर मंत्री महोदयांनी लगेचच गाडी थांबवायला सांगितली त्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू वाहनाच्या खाली उतरले व त्यांनी मुलांकडून त्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या पूर्ण शेंगा विकत घेतल्या. एकाच झटक्यात पूर्ण माल विकल्या गेल्याने मुलंसुध्दा आनंदीत झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यमंत्री कडू सोमवारी सकाळी अमरावतीवरून मतदार संघाच्या दौऱ्यासाठी निघाले होते. कठोरा मार्गे चांदूरबाजारला येत असतांनाच गोपाळपूर ते पुसदा गावादरम्यान दोन मुल मुगाच्या शेंगा विकत असतांना त्यांना दिसली. त्यांनी वाहन थांबवले आणि शेंगा विकणाऱ्या मुलांजवळ आले. त्यांनी मुलांना शेंगांचा भाव विचारून, सर्व शेंगा मोजून देण्यास सांगितल्या. शेंगा मोजणी होईपर्यंत त्यांनी दोन्ही मुलांच्या शाळा व अभ्यासाबाबत माहिती घेतली. 



यावेळी ही दोन मुले शाळा बंद असल्याने त्यांच्या वडिलांना शेंगा विकण्यासाठी हातभार लावत असल्याचे कळले. या वयात शेतकरी वडीलांप्रती मुलांची जिज्ञासा पाहून राज्यमंत्री कडूंना समाधान वाटले. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी शेंगांच्या किंमतीपेक्षा जास्त रक्कम बक्षिस म्हणून दिली. यावेळी रस्त्यांने जाणारी इतर वाहन धारकही शेंगा विकत घेत होते. या लहान मुलांना दिवसभर शेंगा विकायचे काम पडू नये म्हणून, कडू यांनी सर्व शेंगा विकत घेतल्या असल्याचे यावेळी दिसून आले.


मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शेंगा खरेदी....


सध्या कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या या लहान मुलांनी आपल्या वडिलांनी शेतात पिकविलेला माल रस्त्याच्या कडेला बसून विकणे हे या मुलांच्या शेती व्यवसायातिल प्रगतीचे द्योतक आहे. यावेळी मला त्यांतील शेती व्यसायातील उद्योजकता दिसून आली. 


त्यांच्यातील शेती व शेतकरी यांच्या बद्दलचा आदर कायम राहावा. मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी, मी त्यांच्या जवळील शेंगा विकत घेतल्या. जेणेकरून त्यांच्यात शेती आणि शेतमाल व्यवसायाबद्दल विश्वास निर्माण व्हावाअसे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.