मुलाच्या लग्नाच्या खर्चातून नागरिकांचे लसीकरण करणार - आमदार गणपत गायकवाड
लग्नकार्याचा खर्च वाचवून त्यातून नागरिकांचं लसीकरण करण्याचं भाजप आमदाराचा मोठा निर्णय
आतिष भोईर, कल्याण : कल्याण-पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या मुलाच्या लग्नाचा खर्च वाचवून त्यातून नागरिकांचे लसीकरण करणार असल्याचं म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना आमदार गणपत गायकवाड यांचा हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. एकीकडे कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी नागरिकांचं लसीकरण होणं महत्त्वाचं असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाचे 4 मे रोजी लग्न होणार आहे. या लग्नासाठी काही महिन्यापासून गायकवाड कुटुंबियांनी तयारी सुरु केली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मुलाचे लग्न अत्यंत साधेपणा करण्याचा निर्णय आमदार गपणत गायकवाड यांनी घेतला आहे. या लग्नासाठी जो खर्च येणार होता, ते सगळे पैसे मतदारसंघातील नागरीकांच्या लसीकरण मोहिमेसाठी खर्च केले जातील, अशी घोषणा आमदार गायकवाड यांनी केली आहे. मतदारसंघातील 1500 नागरिकांना स्वखर्चातून लस उपलब्ध करून देण्याचा निर्धार गायकवाड यांनी केला आहे.
लग्न कार्यासाठी होणाऱ्या खर्चाला कात्री देत त्या खर्चातून नागरिकांचं लसीकरण करण्याचा निर्णय भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी घेतला आहे. याआधी आमदार निधीतून 1 कोटी रुपये मंजूर करुन कल्याण पूर्वेत ऑक्सीजन प्रकल्प सुरु करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे.
कल्याणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयांमध्ये बेड मिळणं कठीण झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. त्यातच ऑक्सीजन आणि रेमडिसीवर इंजेक्शनची कमी यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे.
कोरोनाच्या लढाईत ऑक्सिजन सर्वात महत्वाची गरज असून ऑक्सिजन पुरवठा थांबल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोवीड रुग्णांचा वेग पाहता येत्या काही दिवसांत ऑक्सिजनची कमतरता आणखी मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले.