सोलापूर : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राज्यातील विविध भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. देशातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण आता महाराष्ट्रात आढळून येत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. यावर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मात्र वेगळं मत व्यक्त केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रणिती शिंदे यांनी म्हटलं की, 'राज्यात लॉकडाऊन होणार नाही. लॉकडाऊन होऊ देखील नये. लॉकडाऊनची झळ गरिबांना जास्त बसते. मास्कचा वापर केला तर परिस्थिती टाळता येऊ शकते. लॉकडाऊन होऊ नये या मताची मी आहे.' 


काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्य़ाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 


'शरद पवार यांच्या बद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. महाविकास आघाडी एकत्र येण्यामध्ये देखील पवार साहेबांचे योगदान मोठे आहे. मात्र सोनिया गांधी या यूपीएच्या चेअरमन आहेत. आणि त्याच आमच्या नेत्या आहेत. अशी प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. 


राज्याच्या गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर सुरु असलेल्या टीकेबाबत देखील प्रणिती यांनी भाष्य केलं. रश्मी शुक्ला यांच्यावर होणारे आरोप जर खोटे असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मात्र या प्रकरणाची कारवाई अद्याप सुरु आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर यावर भाष्य करु अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.