मटण पार्टी, पैशाच्या जोरावरच लढवली सांगोला कारखान्याची निवडणूक
मोठा गौप्यस्फोट सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी केलाय
मुंबई : सांगोला सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पैसे, पार्टीची उधळपट्टी झाली. मतदारांना ३-३ हजार रूपये रोख, मटण, मासे पार्टी दिल्याची कबुली आमदार शहाजी पाटील यांनी दिली आहे. असा मोठा गौप्यस्फोट सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात केला.
सांगोला निवडणुकीत गणपतराव देशमुख गटाला कसा हिसका दाखवला याचं रसभरीत वर्णनच शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी व्यासपीठावरून केलं. विशेष म्हणजे सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांच्या उपस्थितीतच त्यांनी ही मुक्ताफळं उधळली. तसंच सांगोला कारखान्याच्या दूरवस्थेला आपणच काहीव प्रमाणात जबाबदार असल्याचंही मान्य केलं.
वाकी शिवणे, तालुका सांगोला येथील सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना अलीकडेच राज्य सहकारी बॅंकेने पंढरपूर येथील उद्योगपती अभिजित पाटील यांच्या धाराशिव साखर कारखान्याला 25 वर्षांच्या भाडेपट्टा कराराने चालवण्यास दिला आहे. अभिजित पाटील यांनी अवघ्या दीड महिन्यात कारखाना सुरू केला. कारखान्याचा प्रथम गळीत हंगामाचा प्रारंभ सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून झाला. याच कार्यक्रमात या कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार शहाजी पाटील यांनी दिली.
कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना पेैसे वाटून आणि त्यांना मटण खायला घालून कारखान्याच्या निवडणुकीत गणपतराव देशमुख गटाला कसा हिसका दाखवला, हे सांगताना त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीत आपण कसा प्रताप केला, हे देखील सांगून टाकले. कारखान्याच्या दुरवस्थेला माझ्यासह सर्वच नेते जबाबदार आहेत. मी देखील तितकाच पापी असल्याची कबुली देत, त्यांनी याच जाहीर कार्यक्रमात शेतकऱ्यांची माफी देखील मागितली. आमदार पाटील यांच्या या गौप्यस्फोटामुळे कारखाना का बंद पडला, याचे उत्तरही उपस्थितांना मिळाले आहे.