मनसेचा १४ वा वर्धापनदिन सोहळा नवी मुंबईत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन सोहळा पहिल्यांदाच मुंबई बाहेर
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन सोहळा पहिल्यांदाच मुंबई बाहेर होतोय. नवी मुंबईत ९ मार्चला मनसेचा १४ वा वर्धापनदिन सोहळा होणार आहे. विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी इथे हा वर्धापनदिन सोहळा पार पडणार आहे.
नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा मनसेच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. पक्ष स्थापनेनंतर मनसेने २०१० साली नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक लढवली होती मात्र यश मिळाले नव्हते. २०१५ साली मनसेने नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक लढवली नाही. आता मात्र एप्रिल २०२० मध्ये होणारी निवडणूक ताकदीने मनसे लढवणार आहे. तसे संकेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी मनसेच्या नवी मुंबईतल्या पश्चिम महाराष्ट्र महोत्सव या कार्यक्रमात उपस्थित असताना दिले आहेत.
मनसे नेते अमित ठाकरे ही गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईत पक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंदोलनात आणि कार्यक्रमात सातत्याने सहभागी होत आहेत. नवी मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांचा नवी मुंबईतला वावर वाढला आहे. गेल्या काही दिवसात मनसे भाजप जवळीक वाढलेली पाहायला मिळतेय. त्यामुळे मनसे स्वबळावर निवडणूक लढणार की भाजपा सोबत जाणार ? अशी ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.