MNS Activist ransack Amol Mitkari Car: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे. मनसे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही वेळासाठी वातावरण तापलं होतं. दरम्यान, अमोल मिटकरी यांनी यावर व्यक्त होताना आपण अशा धमक्यांना भीक घालत नाही असं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमोल मिटकरी अकोला शहरातील विश्रामगृहात आले असता मनसैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला. यावेळी अमोल मिटकरी यांच्या समर्थकांसोबत मनसैनिकांची बाचाबाची झाली. यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. यानंतर अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड सुद्धा करण्यात आली.


नेमकं प्रकरण काय?


मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सोमवारी पुणे दौऱ्यादरम्यान पूरस्थितीवरुन अजित पवारांना (Ajit pawar) चिमटा काढला होता. उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं असा टोला त्यांनी लगावला. यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे अशी जहरी टीका अमोल मिटकरी यांनी केली होती. तसंच राज ठाकरेंना सुपारीबहाद्दर म्हटलं. 


"पाऊस पडणं आपल्या हातात नाही. पण असा पाऊस  पडल्यानतंर दरवाजे उघडले जातील त्याचा लोकांना त्रास होणार नाही याचं कोणतं प्लॅनिग केलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक तर पुण्याचे आहेत. ते नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं. त्यांनी यात लक्ष घालायला नको का?  नदी जाणारं जगातील हे एकमेव शहर नाही. तिथे ज्या गोष्टी होतात त्या आपल्याकडे का होत नाही. इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा यावर बोललं पाहिजे," असी संतप्त टीका राज ठाकरेंनी केली होती 


अमोल मिटकरींकडून राज ठाकरेंचा सुपारीबहाद्दर म्हणून उल्लेख


"दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबद्दल सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण या सुपारीबहाद्दरांचं टोलनाक्याचं, भोंग्याचं किंवा इतर कोणतंही आंदोलन यशस्वी झालं नाही. या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे," अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली. 
 
सुपारीबहाद्दर नेत्यांकडून जनतेने योग्य तो धडा घेतला आहे. नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून पुण्यात भेट द्यायची. ज्या व्यक्तीला NDRF चा लाँग फॉर्म माहित नाही, तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतो हा अलीकडच्या काळातील राजकारणातील सर्वात मोठा जोक आहे अशी खिल्लीही त्यांनी उडवली आहे.