मनसेचे विमान शिवसेनेकडून हायजॅक
...
रत्नागिरी: आपल्या समाजात पळवापळवी ही तशी मुळीच नवीन नाही. त्यात राजकीय क्षेत्रात तर हा प्रकार काहीसा अधिकच. अगदी उमेदवार पळवण्यापासून ते थेट कार्यकर्ते पळविण्यापर्यंत सर्व काही चालते. पण, गंमत अशी की इथे तर चक्क विमानच पळवले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मंजूर झालेले हे विमान शिवसेनेने पळवले आहे. महत्त्वाचे म्हणजे हे विमानही साधेसुधे नव्हे तर, थेट भारतीय हवाई दलाचे. हा प्रकार उजेडात आल्यावर रत्नागिरीच्या राजकारणात आता चांगलीच चर्चा रंगली आहे.
काय आहे प्रकरण?
मनसे, शिवसेना यांच्यातील संघर्ष समजू शकतो. पण, त्याचा हवाई दलाच्या विमानाशी काय संबंध, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. तर, त्याचे झाले असे, खेड तालुक्यातील शिवतर गावातील हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मारक म्हणून हवाई दलाचे जुने विमान मिळावे अशी खेडवासीयांची इच्छा. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे गेली तीन वर्षे प्रयत्नशिल होते. भारतीय हवाई दलाकडे अनेक पत्रव्यवहार आणि खटपटी केल्यावर वायुसेनेच्या पूर्वीच्या वापरातील टीटीएल-एचपीटी ३२ हे लढाऊ विमान खेड नगर परिषदेला मंजूर झाले.
दरम्यान, मंजूर झाल्याप्रमाणे एका मालवाहू ट्रकने हे विमान ८ जून रोजी खेडमध्ये दाखल झाले. पण, पुढे घडले भलतेच. हे विमान थेट योगिता दंत महाविद्यालयात उतरले. या प्रकारानंतर हे विमान घेऊन आलेल्या मालवाहू ट्रकचालकाची दिशाभूल करून पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांचे स्वीय सहाय्यक योगेश सदावत्रे यांनी ते कदम यांच्या संस्थेच्या परिसारत हे विमान नेल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, हवाई दलाकडून आम्हाला विमान मंजूर झाल्याचे सांगण्यात येत होते. पण, ते थेट आमच्याकडे पाठविण्यात आले आहे, याबाबत त्यांनी आम्हाला कल्पना दिली नव्हती. दरम्यान, विमान आल्यावर ते ठेवण्यासाठी आम्ही शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात ते ठेवण्यासाठी तयारीला लागलो होतो. सर्व तयारीही पूर्ण झाली. पण, विमान काही आले नाही. मात्र, गेल्या शुक्रवारी संरक्षण विभागाकडून विचारणा झाली. मग आम्हाला धक्काच बसला. आम्ही चौकशी केली असता विमान दंतमहाविद्यालयात पोहोचल्याचा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान चोरणे हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे सदावत्रे यांच्याविरूध्द खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याची माहिती आहे.