गौतमी पाटीलच्या लावणीला आवर घाला, नाहीतर... मनसेचा गंभीर इशारा
लावणी कलाकार Gautami Patil पुन्हा एकदा वादात, MNS ने थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली तक्रार...
नितेश महाजन, झी मीडिया, जालना : लावणी कलाकार आणि इस्टांस्टार गौतमी पाटील (Gautami Patil) सोशल मीडियावरचा (Social Media) एका लोकप्रिय चेहरा. तिच्या लावणी कार्यक्रमांना (Lavni) तुफान गर्दी होते. सोशल मीडियावरही तिचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. पण तिच्यावर अनेक वेळा टीकाही झाली आहे. लावणी करताना ती करत असलेले हावभाव अश्लिल असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येतो. आता तर मनसेनंही (MNS) तिच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
गौतमी पाटीलच्या डान्सला आवर घाला
गौतमी पाटील हिच्या विकृत डान्सला आवर घाला अन्यथा गृहमंत्रालयाच्या कार्यालयाच्या काचा फोडण्यात येतील असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे. गौतमी पाटील हिच्या अश्लिल डान्सवर आक्षेप नोंदवत मनसेने जालन्यातील सेवली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकामार्फत पोलीस महासंचालकांकडे ही तक्रार देण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेने एक पत्रच पाठवलं आहे.
मनसेने काय लिहिलंय पत्रात?
हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे अनेक कलाकार संस्कृती जपून आपला डान्स सादर करत असतात. मात्र अभिनेत्री गौतमी पाटील ही हेतू पुरस्पर अश्लिल हावभाव दाखवत डान्स करत आहे. याचे व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करुन व अश्लीलरित्या अंग प्रदर्शन करून हावभव करत आहे. यामुळे महाराष्ट्रात अश्लीलतेचं वातावरण निर्माण होत आहे. याचे वाईट परिणाम राज्यातील तरुणांवर होत आहे. म्हणून गौतमी पाटील हिच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी व महाराष्ट्रतृातील गुणी कलाकर यांच्या नावाला कलंक लावू नये, ही विनंती. असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे.
या मागणीवर कारवाई न झाल्यास गृह मंत्रालयाच्या काचा फोडण्यात येतील असा थेट इशाराच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारीणी सदस्य सिद्धेश्व काकडे यांनी दिला आहे.
सुरेखा पुणेकर यांनीही केली टीका
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही गौतमी पाटीलवर टीका केली आहे. ज्या कलाकारांकडे लावणीचे गुण आहेत, तिला प्रोत्साहन द्या. अपुरे कपडे घालणे आणि अश्लील वर्तन करुन नाचणं याला लावणी म्हणत नाहीत अशी टीका सुरेखा पुणेकर यांनी केली आहे. अशा कलाकारांना समाजात अजिबात स्थान देऊ नका, अन्यथा महाराष्ट्राचादेखील बिहार होईल असंही सुरेखा पुणेकर यांनी म्हटलंय.