ठाणे : मोठा आव आणत मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलनं शनिवारी ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात आंदोलनाची स्टंट बाजी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण आणि डोंबिवलीत फेरीवाल्यांना आधीच आंदोलनाची खबर लागल्यानं आंदोलनाच्या वेळी फेरीवाले गायब झाले होते. मग जे दोन तीन फेरीवाले सापडले त्यांच्या सामानाची तोडफोड,नासधूस करण्याची नौटंकी मनसे कार्यकर्त्यांनी दोन्ही शहरात केली. 


आंदोलनानंतर फेरीवाल्यांना आणि महापालिकेला दम देत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारासुद्धा दिला. मात्र काल मनसे कार्यकर्त्यांची पाठ वळते न वळते तोच लपलेले फेरीवाले आपलं लपवलेलं सामान घेऊन पुन्हा रस्त्यांवर आले. 


आजची परिस्थिती सुद्धा काहीच वेगळी दिसत नाहीय. आजही कल्याण आणि डोंबिवलीत रस्त्यांवर फेरीवाले हे जसेच्या तसे ठाण मांडून आहेत. एक प्रकारे ते महापालिकेला आणि खास करून मनसेला आव्हान देत असल्याचं दाखवून देत आहेत. 


काही केल्या फेरीवालामुक्त शहर न करण्याचा विडाच जणू महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उचलला आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे. 


मात्र मनसेच्या आंदोलनाचा फुसका बार ठरला असून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यानं त्यांच्यावर आता अटकेची तलवार लटकत आहे. त्यामुळे एकूणच फेरीवाले प्रश्नावर महापालिका, मनसे आणि सत्ताधारी सेना-भाजप काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहीलं आहे.