देवेंद्रजी, तो निर्णय मला आवडला नाही, फडणवीस म्हणाले, तत्काळ मागे घेतो, 11 पोलिसांसाठी सुखवार्ता
राज ठाकरेंनी फिरवला फोन, फडणवीसांनीही तत्काळ शब्द पाळला!
Raj Thackeray call Devendra Fadnavis : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात आंबेडकरवादी संघटनांनी आंदोलन केलीत. चंद्रकांत पाटील यांनी यावर दिलगिरी व्यक्त केली होती तरीही त्यांच्यावर पुण्यामध्ये शाईफेक झाली. शाई फेक प्रकरणात तिथं उपस्थित 11 पोलिसांना निलंबित करण्यात आलं होतं. पोलिसांचं निलंबन कशासाठी अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून येऊ लागल्या. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानावर ही गोष्ट घातली. राज यांनी आपला फोन फिरवत फडणवीसांसोबत याबाबत चर्चा केली. फडणवीस यांनीही त्यांचं निलंबन मागे घेण्याचा शब्द राज ठाकरे यांना दिला. याबाबत राज यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
हे सगळं जेव्हा मला कळलं तेव्हा मला सर्वप्रथम हळहळ वाटली ती माझ्या पोलीस बांधवांबद्दल. पोलिसांना हा प्रकार रोखता आला नाही हे मान्य, पण तरीही त्यांच्यावरची कारवाई मला तरी अनाठायी वाटली आणि त्यामुळे मी अस्वस्थ होतो. माझं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांच्याशी देखील बोलणं झालं. पोलिसांवरच निलंबन मागे घेऊन, त्यांना पुन्हा सेवेत घ्यावं अशी विनंती मी त्यांना केली, ज्याला त्यांनी तात्काळ होकार दिल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी पत्रामध्ये राज ठाकरेंनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले.
निषेधकर्त्यांच्यावतीने ह्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मला विनंती केली की, मी ह्या प्रकरणात मध्यस्थी करावी, कारण ही कलमं कायम राहिली तर ह्या कार्यकर्त्यांचं आयुष्य उध्वस्त होईल. म्हणून मी स्वतः चंद्रकांत दादांशी बोललो, त्यांच्या कानावर ह्या सगळ्यांचं म्हणणं घातलं. त्यावर त्यांनी माझ्या विनंतीचा मान ठेवत 307 सारखं कलम शिथिल करण्याची तयारी दाखवल्याचं राज यांनी सांगितलं.
दरम्यान, माझी महाराष्ट्रातील तमाम राजकीय कार्यकर्त्यांना विनंती आहे की, निषेध जरूर नोंदवा पण सवंग प्रसिद्धीसाठी असं काहीही करू नका, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं आहे.