Raj Thackeray About Gautami Patil: गौतमी पाटीलसंदर्भातील प्रश्नावर राज ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर! म्हणाले, `महाराष्ट्र...`
Raj Thackeray Talk About Gautami Patil: मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या गौतमी पाटीलबद्दल राजकीय नेत्यांपासून किर्तनकारांपर्यंत अनेकजणांनी भाष्य केलेलं असतानाच आता राज ठाकरेंनीही गौतमीसंदर्भातील प्रश्नाला थेट उत्तर दिलं आहे.
Raj Thackeray Talk About Gautami Patil: महाराष्ट्रामध्ये आणि खास करुन राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटीलची (Gautami Patil) चांगलीच चर्चा आहे. गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये होणारा गोंधळ हे कारण असलं तरी सोशल मीडियावरुन गौतमीच्या डान्सबरोबरच तिच्या या कार्यक्रमांमधील व्हिडीओ (Gautami Patil Dance Videos) तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. गौतमीच्या डान्सच्या कार्यक्रमांचं (Gautami Patil Show) आयोजन करण्यासाठी चढाओढ लागल्याचं चित्रही पहायला मिळत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी गौतमीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी लाखो रुपये मोजण्यास तयार आहेत असं चित्र सध्या दिसत आहे. गौतमीसंदर्भात राजकीय वर्तुळामधूनही प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये मिश्कील शैलीत गौतमीच्या कार्यक्रमांचा समाचार घेतल्याचं दिसलं. ज्येष्ठ किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनीही गौतमीच्या मानधनासंदर्भात किर्तनादरम्यान केलेलं विधानही गाजलं होतं. असं असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गौतमी पाटील संदर्भातील प्रश्नाला अगदी मोजक्या शब्दांमध्ये थेट उत्तर दिलं आहे.
गौतमीसंदर्भातील प्रश्नावर राज ठाकरेंचं थेट उत्तर
शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासंदर्भात प्रश्न विचारला. "गेल्या काही दिवसांपासून पाहिलं तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून गौतमी पाटील सारख्या कलकारांच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे," असं म्हणत एका पत्रकाराने राज ठाकरेंचं या कार्यक्रमांच्या आयोजनासंदर्भातील मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रश्नावर राज यांनी थेट, "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्याच्याशी काहीही संबंध नाही," असं उत्तर दिलं. तसेच अन्य एका पत्रकाराने, "गौतमी पाटील जिथे जिथे जाते त्या ठिकाणी..." असं म्हणत आपला प्रश्न पुर्ण करण्याआधीच राज ठाकरेंनी, "नाही, मला त्या विषयावर बोलायचं नाही," असं उत्तर दिलं.
अल्पवीयन मुली गायब होण्यासाठी सोशल मीडिया जबाबदार
"महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांमधील अशी आकडेवारी आली आहे की अल्पवयीन मुली बेपत्ता. यासंदर्भात हे सरकार कमकुवत ठरतंय, संस्कार बिघडत आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे," असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर राज यांनी, "या सगळ्या गोष्टींना सोशल मीडिया कारणीभूत आहे. त्यावर ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्यामुळे अनेक नव्या गोष्टींसाठी बुद्धीला चालना मिळते. हे नव्याने होतंय अशातला भाग नाही याच्याआधीही होत होतं. माझ्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की महाराष्ट्र पोलिसांना 48 तास द्या. एकदा देऊन बघा हे 48 तास असली प्रकरण परत होतात का बघा," असं चूक विधान राज यांनी केलं.