Raj Thackeray on Pune Attack: पुण्यातील सदाशिव पेठेत दिवसाढवळ्या एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचं सीसीटीव्ही व्हायरल झालं असून, मदतीला कोणीही पुढे न धावल्याने लोक नाराजी व्यक्त करत आहेत. तरुणीवर हल्ला होत असताना लोकांनी बघ्याची भूमिका घेतल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही नाराजी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट केलं असून शिंदे सरकारलाही (Maharashtra Government) सुनावलं आहे. 


राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं," असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. 


"दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी," असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. तसंच माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 



नेमकं काय झालं? 


पुण्यात सदाशिव पेठ येथे मंगळवारी सकाळी एका महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. शंतनू लक्ष्मण जाधव असं या हल्लेखोर आरोपीचं नाव आहे. शंतनूचे सुतारदरा परिसरात राहणाऱ्या तरुणीसह प्रेमसंबंध होते. महाविद्यालयात बारावीला असताना त्यांचे संबंध जुळले होते. पण नंतर शंतनूच्या वागणुकीला कंटाळून तिने संबंध तोडले होते. यामुळे संतापलेला शंतनू तिला त्रास देत होता. यात संतापातून त्याने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. 


शंतनू मारुती मंदिरावजळ दबा धरुन बसला होता. तरुणी तिथे येताच त्याने तिला जाब विचारला. पण तरुणीने हटकल्यानंतर त्याचा संताप झाला आणि त्याने कोयता काढत हल्ल्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या तरुणीच्या मित्राने त्याला अडवलं पण तरीही तो थांबला नाही. पण यावेळी रस्त्यातील कोणीही मदतीला पुढे येत नव्हतं. 


लेशपाल जवळगे या तरुणाची धाव


शंतनू तरुणीवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असतानाच लेशपाल जवळगे या तरुणाने त्याला अडवलं. लेशपाल अभ्यासिकेत जात असताना त्याने हा सर्व प्रकार पाहिला आणि मदतीसाठी धाव घेतली. त्याने वेळीच मध्यस्थी केल्याने तरुणीचा जीव वाचला. यानंतर शंतनू पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं.