Raj Thackeray On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यामधील भाषणातून राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं आहे. या भाषणामध्ये राज ठाकरेंनी आकड्यांचा उल्लेख करत आपल्याला लोकांनी मतदान केलं. मात्र ते मतदान कुठेतरी गायब झालं असं म्हटलं आहे. तसेच निकालानंतर राज्यात कुठेच उत्साह दिसला नाही तर सन्नाटा दिसून आला असंही राज ठाकरे म्हणाले. 


इतका सन्नाटा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"लोकसभेच्या निकालानंतर राज्यात सन्नाटा दिसून आला. काय हे? कसं झालं? असे प्रश्न लोकांच्या चेहऱ्यावर दिसलं. संघाची एक व्यक्ती निकालानंतर मला भेटायला आली होती तिने एक छान वाक्य म्हटलं. ती व्यक्ती म्हणाली की, 'इतका सन्नाटा क्यू है भाई, कोई तो जिता होगा," असं राज ठाकरे भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले. 


मी काय अख्खा महाराष्ट्र बोलतोय


विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना राज ठाकरेंनी, "काही काही गोष्टींवर विश्वासच बसू शकत नाही. इथे राजू पाटील बसले आहेत. 1400 लोकांच्या गावात राजू पाटलांना किती मतं पडली असतील? त्या गावातून राजू पाटलांना एकपण मत पडलं नाही. यापूर्वीच्या निवडणुकींमध्ये त्यांना त्यांच्या भावाला मतदान झालं होतं. संपूर्ण मतं 1400 मतं राजू पाटलांना पडायची त्यापैकी एकही मत पडत नाही. आपल्या मराठवाड्यातील नगरसेवकाला त्याच्या भागातून साडेपाच हजार मतदान आहे त्याच्या वॉर्डातून. आता विधानसभेला त्याला किती मतदान झालं अडीच हजार. 70 ते 80 हजार मतांनी निवडणून येणारे बाळासाहेब थोरात 10 हजार मतांनी पराभूत झाला," असं म्हणत हे सारं विश्वास बसण्यासारखं नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. तसेच, "राज ठाकरेंचा पराभव झाल्याने ते असं बोलतात म्हणतील लोक. मी काय अख्खा महाराष्ट्र बोलतोय," असंही राज ठाकरे म्हणाले. 


नक्की वाचा >> राज ठाकरेंची 'ती' पोज पाहून सभागृह खळकळून हसलं; राज म्हणाले, 'भाजपा नेत्यांना...'


तीन महिन्यात लोकांचं मत बदललं?


"जे निवडून आलेत त्यांनाही शॉक बसलाय. मला अनेकांचा फोन आले. भाजपाला 132 जागा मिळाल्या. त्यापूर्वी 105 आणि 2014 ला 122 जागा होत्या. अजित पवारांना 42 जागा? चार-पाच जागा येतील असं वाटत असताना 42 जागा कोणाचा तरी विश्वास बसेल का? अजित पवार, भुजबळ ज्यांच्या जीवावर राजकारण करतात त्या शरद पवारांना 10 जागा. कोणाला तरी विश्वास बसण्यासारखं आहे का?" असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. तसेच पुढे बोलताना, "लोकसभेला सर्वाधिक खासदार काँग्रेसचे निवडून आले. सर्वसाधारणपणे एक खासदार म्हणजे 6 आमदार असतात. त्यांचे 15 आमदार येतात. शरद पवार साहेबांचे 8 खासदार त्यांचे 10 आमदार येतात. अजित पवारांचा 1 खासदार आला त्याचे 42 आमदार येतात. तीन महिन्यात लोकांचं मत बदललं?" असं राज ठाकरे म्हणाले. 


आपल्याला लोकांनी मतदान केलेलं आहे


राज ठाकरेंनी कार्यकर्त्यासमोर भाषण करताना, "या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाही. आपल्याला केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं," असं म्हणताच कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. "अशा निवडणुका लढवायच्या असतील तर न लढवलेल्या बऱ्या. कोणी विजयाचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो अशा गोष्टी होत असतात," असं राज ठाकरे म्हणाले.


...तर कसं होणार?


"मला एकच गोष्ट सांगायची आहे. ज्या गोष्टी आजपर्यंत पक्षाने तुम्हाला दिल्या, ज्या गोष्टी सांगितल्या, जी आंदोलन केलं, ज्या गोष्टींचे निर्णय लागले त्या सतत लोकांसमोर मांडत राहा. आतापर्यंत आपण काय काय केलं, कोणती आंदोलन केली. कोणते विषय मार्गी लागले हे लोकांना सांगितलं पाहिजे. काय केलं विचारल्यावर भांबावून जाणं चांगलं लक्षण नव्हे. तुम्ही जाणीवपूर्वक केलेल्या प्रचाराबद्दल खमके नसाल तर कसं होणार?" असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. राज ठाकरेंच्या पक्षाने विधानसभेच्या 120 हून अधिक जागा लढवल्या होत्या. मात्र त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाही.