राज ठाकरेंची 'ती' पोज पाहून सभागृह खळकळून हसलं; राज म्हणाले, 'भाजपा नेत्यांना...'

Raj Thackeray On Meeting BJP Leaders: राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीनंतर घेतलेल्या या पहिल्याच जाहीर मेळाव्यात अनेक विषयांना हात घातला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 30, 2025, 01:51 PM IST
राज ठाकरेंची 'ती' पोज पाहून सभागृह खळकळून हसलं; राज म्हणाले, 'भाजपा नेत्यांना...' title=
पोज देत राज ठाकरेंचा हल्लाबोल

Raj Thackeray On Meeting BJP Leaders: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी सोहळा आज मुंबईमध्ये पार पडला. या मेळाव्यामध्ये पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी केलेल्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या वरच्यावर होणाऱ्या भेटीगाठींवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपावर बोलताना राज ठाकरेंनी एका भेटीचा मजेदार किस्सा भाषणात सांगितला. राज ठाकरेंनी हा किस्सा सांगताना केलेले हावभाव आणि स्टेजवरच दिलेली पोज पाहून संपूर्ण सभागृह खळखळून हसलं. 

भाजपाच्या लोकांना भेटू नये असं काहीजण म्हणतात

भाषणादरम्यान, राज ठाकरेंनी, "राज ठाकरेंनी भाजपाच्या लोकांना भेटलं नाही पाहिजे असं काहींचं म्हणणं असतं. पण ते जेव्हा मला भेटायला येतात तेव्हा मी तुम्हाला विकत नाही. माझा मराठीचा बाणा देखील मी बोथट करत नाही. येतात आणि भेटतात," असं म्हटलं. भाजपाच्या नेत्यांच्या भेटीचा किस्सा सांगताना राज ठाकरेंनी, "मी नाशिकला होतो. समोरुन चंद्रकांत पाटील आले. म्हणाले मुंबईत आलो की येतो चहा प्यायला. आता अशी परिस्थिती तुमच्यावर आल्यावर काय कराल? तुम्ही काय सांगाल की चहा प्यायला कशाला येता? कशाला चहा प्यायची गरज आहे? असं म्हणायचं का?" असा सवाल राज ठाकरेंनी केला.  

राज ठाकरेंनी दिलेली पोज पाहून एकच हशा

पुढे बोलताना राज ठाकरेंनी "बरं अनेक नेते भेटीनंतर पत्रकारांसमोर बाहेर काहीतरी वेगळं बोलतात. आत काहीतरी वेगळं झालेलं असतं. बाहेर काहीतरी वेगळं बोलतात. चंद्रकांत पाटील मला भेटायला आले. माझ्याशी चर्चा करुन ते बाहेर पडले. त्यांना पत्रकारांनी विचारलं काय झालं. तर आपण काय सांगू सहज चर्चा झाली, भेटायला आलो होतो वगैरे. पूर्वी राजकारणात सगळे एकमेकांना भेटायचे. पक्षाच्या धोरणांमध्ये कधी तडजोड व्हायची नाही. वैर घेतल्यासारखं आहे असं काही नाही. चंद्रकांत पाटील बाहेर पडल्यानंतर त्यांनी पत्रकारांसमोर काय केलं असेल. त्यांना पत्रकारांनी विचारलं तुम्ही एक तास आत होता काय चर्चा झाली? त्यावर त्यांनी काय केलं असेल?" असं म्हणत ठाकरेंनी उजवा हात करत दंडाची बेटकुळी काढून दाखवली. राज ठाकरेंनी केलेली पोज पाहताच संपूर्ण सभागृह हसू लागले. 

नक्की वाचा >> 'लोकांनी आपल्याला मतदान केलं, फक्त ते...'; विधानसभा निकालावरुन राज ठाकरेंनी सगळंच काढलं

म्हणजे नेमकं झालं काय?

राज ठाकरेंनी पुढे बोलताना, "याचा अर्थ काय होता मला कळला नाही. त्यांनी मला कडेवर घेतलं होतं, की त्याचा इतर काही अर्थ होता हेच मला कळलं नाही. मी त्यांची ही कृती पाहिली नव्हती. नंतर पत्रकारांनी येऊन मला सांगितलं की त्यांनी हे असं केलं. तर नेमकं तुमच्यात काय झालं? मी त्यांना विचारतोय असं केलं म्हणजे काय झालं आणि ते मला विचारतायत असं केलं म्हणजे बैठकीत काय झालं? आम्ही एकमेकांना विचारत होतो. काय म्हणजे मी इथे (कोपराजवळ) अक्रोड ठेवलं होतं त्यांनी मी त्यांना ते फोडून दिलं. म्हणजे नेमकं झालं काय?" असं म्हणत राज यांनी हा मजेदार किस्सा सांगताच सभागृहातील सर्व पदाधिकारी खळखळून हसले. 

एक लक्षात ठेवा...

"एक लक्षात ठेवा कोणीही भेटायला आले तर पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही," असा शब्द राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना भाषणाच्या शेवटी दिला. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x