Raj Thackeray On Vidhansabha: विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. त्यामुळे मनसेचा एकही आमदार विधानसभेत दिसणार नाही. निवडणूक निकालानंतर अविश्वसनीय..तुर्तास एवढंच..अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली होती. पण यानंतर राज ठाकरेंकडून काहीच प्रतिक्रिया आली नव्हती. मनसे नेत्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी सर्वांची मतं जाणून घेतली. यानंतर राज ठाकरे प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा साऱ्यांनाच होती. दरम्यान आज मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलले. रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी भाषण केलं. यावेळी मंचावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील उपस्थित होता.


काय म्हणाले राज ठाकरे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षक नावाची गोष्ट राहिली नाही. दहावी, बारावीची मुलं येतात. काय करणार पुढे? असं मी विचारल्यावर मी डॉक्टर, इंजिनीअर होणार असे सांगतात. पण एकही विद्यार्थी मला शिक्षक व्हायचंय असं सांगतात. ज्या देशात विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचं नाही त्या देशाचं काय होणार? असे प्रश्नवजा चिंता राज ठाकरेंनी व्यक्त केली.


 गुरुपोर्णिमेला दरवर्षी आचरेकर सरांच्या पाया पडायला यायचे. पण आजकालची गुरुपोर्णिमा हॅप्पी गुरुपोर्णिमा मेसेजवर थांबते. गुरु नावाची गोष्ट जपणे हे महत्वाचे असते. सुनली रमणी यांच्याशी मी बोललो. इथे आचरेकर सरांचे स्मारक असावे असे मला वाटत होते. इथे मला पुतळा नको होता. इथे स्टम्प, बॅट, सर्व आहे. यावर आचरेकर सरांची कॅप आहे. कॅप त्यांची ओळख होती. आज क्रिकेट बदललंय. साऱ्या गोष्टी बदलल्यात. पण त्यांनी खेळाडूंवर केलेले संस्कार त्यांच्या समोर बसलेल्या खेळाडुंमध्ये दिसतात. आजही विद्यार्थी सांगतात आम्हाला तेंडुलकर, कांबळीसारखं खेळता येत नाही. आचरेकर सर जिनियस होते. 


तुमच्याकडे क्रिकेट बदलत गेल तस आमच्याकडेही (राजकारणात) सारं बदलंत गेलं. क्रिकेटमध्ये थर्ड अम्पायर असतो. त्यावेळी चुकीचा निर्णय बदलता येतो. निवडणूकीत आम्हाला थर्ड अम्पायर मिळाला असता तर अनेक निर्णय वेगळे दिसले असते पण आमच्याकडे असा थर्ड अम्पायर नसतोस असे राज ठाकरे म्हणाले. 


सुनिल रमणीने यासाठी मेहनत घेतली. अनधिकृत करायला गेल्यावर परवानगी लागत नाही. अधिकृत करायला गेल्यावर परवानग्या लागतात, असा टोला राज ठाकरे यांनी प्रशासनातील लाल फितीच्या कारभाराला उद्देशून लगावला.


3 डिसेंबरला सरांची जयंती असताना स्मारकाचे उद्घाटन करण्यास सचिन तेंडुलकर यांनी वेळ दिला आणि उपस्थित राहिले, असेही ते म्हणाले.