Raj Thackeray Veer Savarkar Death Anniversary: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केलं आहे. सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त राज ठाकरेंनी आपल्या अधिकृत एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन सावरकरांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला राज ठाकरेंनी एक सविस्तर कॅप्शन देताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सूचक भाष्य केलं आहे.


सामाजिक क्रांतीचा वस्तुपाठ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये, "स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा आज स्मृतिदिन. सावरकरांचं स्मरण करताना त्यांच्या राष्ट्रवादाच्या चिंतनाबद्दल बोललं जातं पण त्यांच्या सामाजिक चिंतनाबद्दल फारसं बोललं जात नाही.", असं म्हटलं आहे. पुढे राज ठाकरेंनी, "पतितपावन मंदिराच्या स्थापनेतून त्यांनी सामाजिक क्रांतीचा वस्तुपाठच घालून दिला असं म्हणता येईल," असंही मत व्यक्त केलं आहे.


माझी सागरातील उडी विसरलात तरी चालेल पण...


राज ठाकरेंनी सावरकरांच्या एका विधानाचाही उल्लेख या पोस्टमध्ये केला आहे. "सावरकर नेहमी म्हणत की, "माझी अशी इच्छा आहे की, मी सागरात उडी घेतली होती, ही गोष्ट लोक विसरले तरी चालेल, पण मी जे सामाजिक विचार मांडले आहेत त्यांचे समाजाने स्मरण ठेवावे," या विधानाची आठवण राज यांनी करुन दिली आहे. 


राजकारण तलवारीसारखे असेल तर समाजकारण...


पुढे लिहिताना राज ठाकरे म्हणतात की, "त्याच सावरकरांनी 1955 साली पतितपावन मंदिराच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात एक भाषण केलं होतं, त्यात ते असं म्हणाले होते की, "राजकारण तलवारीसारखे असेल तर समाजकारण ढालीसारखे असते. तलवारीच्या आधाराने नवीन भूमी पादाक्रांत करायची आणि समाजकारणाच्या आधारे पायाखाली प्राप्त झालेली भूमी पायाखालीच राहील याची दक्षता घ्यायची."


सध्याच्या स्थितीवर मार्मिक भाष्य


सावरकरांच्या भाषणातील या विधानाचा संदर्भ देत राज ठाकरेंनी सध्य परिस्थितीवर सूचक भाष्य करताना, "फक्त राजकीय भूमी पादाक्रांत करण्याच्या अट्टाहासाच्या काळात सावरकरांचा हा विचार एकूण राजकीय व्यवस्थेला प्रेरणादायी ठरू दे हीच इच्छा," असं म्हटलं आहे. राज ठाकरेंनी, "सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन" असं म्हणत आपली पोस्ट संपवली आहे.



पोस्ट चर्चेत


राज ठाकरेंची ही पोस्ट आणि त्यांनी सावरकरांच्या विधानाचा आताच्या परिस्थितीशी घातलेली सांगड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.