`लाडकी बहीण`, `लाडका भाऊ` एकत्र आले असते तर दोन्ही...`, राज ठाकरेंचा टोला; शिंदे सरकारलाही चिमटा
Raj thackeray On Ladka Bahin Yojana: राज ठाकरेंनी सध्या राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी सूचक शब्दांमध्ये एक विधान केलं आहे.
Raj thackeray On Ladka Bahin Yojana: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या भाषणांसाठी आणि खोचक कोट्यांसाठी ओळखले जातात. आज पुन्हा एकदा मुंबईमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये याचा प्रत्यय आला. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या आढावा बैठकीत भाषण करताना राज ठाकरेंनी राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरु केलेल्या 'लाडका बहीण' आणि 'लाडका भाऊ' योजनेवरुन टोला लगावला आहे.
परदेश दौऱ्याचा दिला संदर्भ
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या कार्यक्रमासाठी अमेरिका दौऱ्यावरुन परतल्याचं सांगताना राज ठाकरेंनी पाश्चिमात्य देशांमध्ये कशाप्रकारे छोट्याछोट्या गोष्टींचा विचार केला जातो हे टॉयलेट पेपरचं उदाहरण देत सांगितलं. आपल्याकडे दरवेळेस पाऊस पडत नसला की चिंता व्यक्त केली जाते. मात्र पाण्याचा वापर काळजीपूर्वक केला जात नाही असं पाश्चिमात्य आणि आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या टॉयलेटमधील पाण्याच्या प्रमाणाचा संदर्भ देत राज म्हणाले. अमेरिका आणि कॅनडाच्या बॉर्डवर जगातील पाच मोठी तलावं असून ते पाणी कमी वापरतात. तशीच गोष्ट लाकडांसंदर्भात असून 'ज्यांच्याकडे जगातील सर्वात मोठी जगलं आहेत तिथे लोकं वारल्यानंतर त्यांना पुरतात आणि आपल्याकडे अत्यंसंस्कारासाठी सर्वाधिक लाकडं वापरली जातात,' असं राज ठाकरे म्हणाले.
'लाडका भाऊ-लाडकी बहीण'वरुन टोला
हाच संदर्भ देत भारतामध्ये मात्र लोकांच्या प्रश्नावर बोलायला सरकारला वेळ नाही असा टोला राज यांनी लगावला. याच संदर्भातून त्यांनी लाडका बहीण आणि लाडका भाऊ योजनेवरुन टोला लगावला. "पाणी, आरोग्य, नोकरीच्या प्रश्नांवर, विषयांवर बोलायला आपल्याकडे वेळ नाही. आपल्याकडे काय सुरु आहे, 'लाडकी बहीण', 'लाडका भाऊ'! आहो, 'लाडकी बहीण' आणि 'लाडका भाऊ' एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. योजना कशाला राबवायची त्याच्यासाठी?' असा टोला राज यांनी कोणाचाही थेट उल्लेख न करता लगावला. मात्र त्यांच्या विधानाचा संदर्भ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने होता असं दिसून येतं.
नक्की वाचा >> 'काहीही झालं तरी...'; थेट किती जागा लढणार सांगत राज ठाकरेंनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
राज्य सरकारलाही टोला
राज यांनी आपल्या भाषणामध्ये राज्य सरकारलाही टोला लगावला आहे. "सरकार बहिणीला दीड हजार देणार. आहेत का पैसे राज्य सरकारकडे? रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत," असा टोला राज यांनी लगावला.
घराघरात जाऊन मदत करा
"आज जो पाऊस पडतोय. जिथे जिथे पूर आलेत, जिथे घरात पाणी गेलं आहे. प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाला मदत करा. वैयक्तिक जाऊन मदत करा. त्यांना यातून बाहेर काढणं गरजेचं. महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं हेच विधानसभेचं कॅम्पेन आणि प्रचार असला पाहिजे. एकमेकांना शिव्या द्यायच्या फक्त. लोकांचं लक्ष विचलित करायचं. यातून निवडणुका करायच्या," असा टोला राज यांनी लगावलं.