Raj Thackeray : पवारांच्या बारामतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठा मेळावा घेणार आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे बारामती मतदारसंघात  कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शक्ती प्रदर्शन करणार आहेत. मनसे नेते वसंत मोरे यांनी ही माहिती दिली. बारामती मतदार संघात राष्ट्रवादीचा दबदबा आहे. मात्र, राष्ट्रवादी पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. यामुळे आता राज ठाकरे नेमकं कोणत्या पवारांना आव्हान देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


राज ठाकरे  बारामती मतदारसंघात घेणार कार्यकर्त्यांचा मेळावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षामुळे मनसेने आता बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे बारामती लोकसभा प्रमुख वसंत मोरे आज बारामती दौऱ्यावरती आले होते. कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाल्यानंतर मनसे नेते वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला,यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती शहरात लवकर राज ठाकरे लवकरच कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेणार असल्याची माहिती मोरे यांनी पत्रकारांना दिली.


यावेळी मोरे म्हणाले की,बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रमुख म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघातील तालुक्यात दौरा सुरू असून, पक्षातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. पक्ष संघटन मजबूत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यावेळी मोरे यांनी निवडणुका लढणे यावर बोलणे टाळले. लवकरच राज ठाकरेंचा बारामती शहरात कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा होणार आहे. याच्यासाठीच मी बारामतीत आलो आहे. असे माध्यमांशी संवाद साधताना मोरे यांनी सांगितले.


वन नेशन वन इलेक्शनचं मनसेकडून स्वागत


सध्या वन नेशन वन इलेक्शनची सर्वत्र चर्चा सुरू आहे.सत्ताधाऱ्यांकडून याला पाठिंबा तर विरोधकांकडून यावर टीका केली जात आहे. मात्र, या दोघांमध्ये राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी सर्व निवडणुका एकत्र होत असतील तर ते चांगलं आहे ,असं मत व्यक्त करीत एक प्रकारे वन नेशन वन इलेक्शन या भूमिकेचे स्वागत केल्याचं दिसत आहे. आमदार पाटील हे कल्याण मधील एका कार्यक्रमाला उपस्थित होते.  मराठा आंदोलकांवर करण्यात आलेला लाठीचार्ज हा दुर्दैवी असून मुख्यमंत्री स्वतः मराठा समाजाचे असून त्यांनी जातीने लक्ष घालून आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असेही पाटील म्हणाले.