देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : मुंबईसह नवी मुंबईत ही कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईसह नवी मुंबईकरांच्या चिंता देखील वाढल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मनसेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून नवी मुंबईत तात्काळ कोविड १९ टेस्टिंग लॅब सुरु करण्याची मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या रोज झपाट्याने वाढत आहे. पण तरी देखील नवी मुंबई शहरात कोरोना टेस्टिंग लॅब नसल्याने रिपोर्ट यायला ८ ते १० दिवस लागत आहेत. अनेकांना सौम्य लक्षणे असली तरी खाजगी हॉस्पिटल ॲडमिट करुन घेते आणि रिपोर्ट ८ ते १० दिवसांनी निगेटीव्ह आले तरी भरमसाठ बिल वसुली केली जाते. तर काही रुग्णांचे निदान लवकर न होत असल्याने उपचारास विलंब झाल्याने मृत्यू होत आहेत. यामुळे संबंधित व्यक्तीचा संसर्ग अनेकांना होत आहे. आजही १०७३ नवी मुंबईकरांचे रिपोर्ट येणे बाकी आहे असे मनपाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातच म्हटले आहे.'


'अनेकदा मनसेसह सर्व पक्षांनी, संस्थांनी, नवी मुंबईकरांनी लॅब सुरू व्हावी म्हणुन मागणी केली आहे. मात्र ती मागणी पालिका आणि आपल्या पर्यंत पोहचत नाही की काय की हेतुपूर्वक आपण याकडे कानाडोळा करत आहात असे आता आम्हांस वाटू लागले आहे.'


'येत्या १० दिवसात लॅब सुरु न झाल्यास नवी मुंबईकरांबरोबरच मनसेचे पदाधिकारी नवी मुंबईत विविध ठिकाणी मनपा प्रशासन व आपल्या विरोधात आंदोलन करतील असा इशारा मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे