`मी जरांगेंना समोरच सांगितलं की..`; राज ठाकरेंचा खुलासा! म्हणाले, `मराठा बांधवांना एकच विनंती..`
Raj Thackeray On Meeting With Manoj Jarage Patil Maratha Reservation: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18 व्या स्थापनादिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटलांचा आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.
Raj Thackeray On Meeting With Manoj Jarage Patil Maratha Reservation: नाशिकमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18 व्या स्थापनादिनानिमित्त विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळेस राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये जाणूनबुजून फूट पाडण्याचा प्रयत्न राजकारण्यांकडून केला जात आहे. स्वार्थी हेतूने राजकीय नेते महाराष्ट्रातील लोकांनी एकत्र राहू नये म्हणून प्रयत्न करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केली. या अशा फूट पाडणाऱ्यांना ओळखावं असंही राज ठाकरे म्हणाले. जातीचं विष पसरवलं जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. यावेळेस त्यांनी मराठा आंदोलनाचं उदाहरण दिलं. हे उदाहरण देताना राज ठाकरेंनी मनोज जरांगे-पाटलांची भेट घेतली तेव्हा त्यांना काय सांगितलं होतं याबद्दलचा खुलासा करताना मराठा समाजाला एक आवाहन केलं आहे.
मनोज जरांगेंना काय सांगितलं?
4 सप्टेंबर 2023 रोजी राज ठाकरे मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत असताना अंतरली सराटीमध्ये भेटायला गेले होते. यावेळेस दोघांमध्ये जवळपास 16 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेत राज ठाकरेंनी जरांगेंना काय सांगितलं होतं याची माहिती त्यांनी आज नाशिकमध्ये स्थापनादिनानिमित्त दिलेल्या भाषणादरम्यान सांगितली. "जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते मी गेलो होतो तिकडे. त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही. होणार नाहीचा अर्थ होऊ नये असा नाही. टेक्निकली हे होऊ शकत नाही. मागे एकदा सगळे मोर्चे निघाले होते 'एक मराठा लाख मराठा.' सगळे आले, सगळ्या बाजुंनी आले. मुंबईत मोर्चे झाले. पुढे काय झालं?" असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अखोरेखित केला परप्रांतीयांचा मुद्दा
"महाराष्ट्रामधल्या मराठा बांधवांना भगिनींना हीच विनंती आहे यांच्या भूल थापांना बळी पडू नका. जी गोष्ट घडू शकत नाही, होऊ शकत नाही याची आश्वासनं ही लोक देत आहेत. आज विषय आहे मुलांच्या नोकऱ्यांचा, शिक्षणाचा. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य शिक्षण देऊ शकत नाही. नोकऱ्या देऊ शकत नाही. बाहेरच्या राज्यांमधली लोक आम्ही पोसायची आणि आमच्याकडचे लोक आंदोलनं करणार?" असं म्हणत राज ठाकरेंनी परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा अधोरेखित करण्यात प्रयत्न केला.
नक्की वाचा >> 'माझं ठाम मत आहे की आतून सगळे..'; दोन्ही पवारांचा उल्लेख करत राज ठाकरेंचं विधान
तुमची मतं विभागली की राजकारण्यांचा फायदा
"इथं जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला शिक्षण आणि रोजगार देणं हे महाराष्ट्राला पूर्णपणे शक्य आहे. पण महाराष्ट्र तुम्ही एकत्र राहातच कामा नये. तुम्ही मराठी म्हणून एकत्र राहूच नये. महाराष्ट्र एकत्र राहू नये तो वेगवेगळा असावा. मग वेगवेगळ्या जातींमध्ये विष कालवायचं. विष कालवायला उभेच आहेत. मराठ्यांचं झाल्यानंतर ओबीसी उभे राहणार. आमच्याकडे महापुरुषांचं वाटप झालेच आहे. हा या जातीचा महापुरुष, तो या जातीचा महापुरुष हे याच लोकांनी करुन ठेवलं आहे. तुमची जेवढी मतं विभागली जातील तेवढा यांचा फायदा आहे," असं राज ठाकरे राजकारण्यांच्या धोरणावर टीका करताना म्हणाले.
नक्की वाचा >> कोकणात लोकसभेपूर्वीच मोठा राजकीय भूकंप? राणेंमुळे 'हा' नेता ठाकरेंची साथ सोडणार?
एका जातीबद्दलचा विषय कोर्टात गेला तर...
"तुम्ही महाराष्ट्राचे मराठी म्हणून एकत्र येणं यांना नको आहे. या देशालाच नकोय. हे तुमच्यामध्ये विष कालवण्याचे धंदे सुरु आहेत हे ओळखा. हा फक्त महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विषय नाही. हा प्रत्येक राज्यातील तिथल्या तिथल्या समाजाचा विषय आहे. एका जातीबद्दलचा विषय कोर्टात गेला तर या देशातील प्रत्येक राज्यातील जाती उभ्या राहतील आणि आरक्षणाचा विषय देशभर पेटेल. जे सुप्रीम कोर्टात होऊ शकत नाही त्यासाठी लोकसभेचं अधिवेशन घ्यावं लागेल. ते घेता येणार नाही जोपर्यंत निकाल येत नाही. याबद्दल कधीतरी वकिलांशी बोलून बघा. मी खोटं सांगत नाही," असं राज म्हणाले.