वीज बिलबाबत २६ तारखेला मनसेचा राज्यभरात मोर्चा
वीज बिलात सवलतीसाठी मनसेचा राज्यभरात मोर्चा, निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
मुंबई : २६ तारखेला गुरुवारी मनसे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. वीज बिला संदर्भात मनसेने सरकारला सोमवार पर्यंतचा अल्टीमेंटम दिला होता. पण वीज बिला संदर्भात कुठला ही निर्णय न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मोर्चा काढल्या नंतर ही निर्णय न झाल्यास मनसे पुढील तीव्र आंदोलनाची तयारी करणार असल्याचं देखील मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
वीज बिलावरून सरकारमध्येच गोंधळ आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर २६ तारखेला निघणारा मोर्चा मनसे कार्यकर्त्यांनी शांततेत काढावा असं आवाहन देखील बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या आधीच सरकारला अल्टीमेटम दिला होता. सरकारने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केल्याचा आरोप मनसेने केला होता. सोमवारपर्यंत याबाबत निर्णय घेतला नाही तर मनसेकडून आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मनसेने दिला होता.
दुसरीकडे इतर विरोधी पक्ष देखील वीज बिलावरुन आक्रमक झाले आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. लॉकडाऊनमध्ये आलेली वीज बिल यात सवलत देऊ असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते मात्र यावर त्यांनी लोकांचा विश्वासघात केला तर राज्य सरकारची भूमिका लोकविरोधी असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.