Mumbai toll hike : टोलवरून मनसेनं पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय. 1 ऑक्टोबरपासून मनसेकडून ठाण्याच्या आनंदनगर टोलनाक्यावर आंदोलन करण्यात येणारंय. येत्या 1 ऑक्टोबरपासून आनंदनगर टोलनाक्यावर वाढीव दर लागू केले जाणार आहेत. यालाच विरोध म्हणून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. राज्याला ठाणेकर मुख्यमंत्री लाभले. सत्तेत येण्याच्या आधी त्यांनी टोलमुक्तीचं आश्वासन दिलं मात्र हे आश्वासन पाळलं नाही अशी टीका मनसेनं केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोलचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रडारवर पक्ष स्थापनेपासूनच पाहायला मिळत आहे. मनसे कडून अनेकदा टोलच्या मुद्द्यावरती खळखट्याक आंदोलन देखील केलं गेलं आहे. मनसेच्या आंदोलनामुळेच महाराष्ट्रातील 65 टोलनाके बंद झाले अशा पद्धतीचा दावा देखील मनसेकडून सातत्याने करण्यात येतो.


काही दिवसांपूर्वीच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे  ताफा नाशिकहून येत असताना टोल कर्मचाऱ्यांनी मनसे कार्यकर्त्यांसोबत केलेल्या अरेरावेमुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक होऊन सिन्नर इथला टोल मनसे कार्यकर्त्यांनी फोडला होता. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा टोलचा मुद्दा चर्चेत आला होता या टोलच्या मुद्द्यावरून मनसे विरुद्ध भाजप अशा पद्धतीचा संघर्ष देखील पाहायला मिळाला.


अनेक आश्वासन दिली गेली, अनेक आंदोलन झाली. परंतु हा टोल काही बंद होण्याच कुठलही चिन्ह दिसत नाही. असे असताना महाराष्ट्राला "ठाणेकर" मुख्यमंत्री लाभला, आपले मुख्यमंत्री सतेत यायच्या आधी आपल्याला टोलमुक्त ठाण्याच आश्वासन मिळालं होतं, परंतु ते मुख्यमंत्री झाल्यानंतर येत्या 1 ऑक्टोबर 2023 पासून आपल्याला पुन्हा टोल वाढीला सामोरे जावं लागणार आहे. म्हणजे ठाणेकरांच्या खिशाला आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांना कात्री लागणार आहे.


 टोल माफ करण्याचे आमिष दाखवून निवडून आले, मंत्री झाले आता मुख्यमंत्रीही झाले तरीही ठाणेकरांना दिलेलं आश्वासन पूर्ण का होत नाही ? आपल्याशी भावनिक खेळ खेळला जात आहे का ? या विषयावर गेली अनेक वर्ष आवाज उठवत आहे आणि यापुढेही उठवत राहील, परंतु एक ठाणेकर म्हणून तुमची देखील जबाबदारी आहे आणि या सगळ्यात आपण देखील सहभागी होण गरजेचे आहे. येत्या ३० सप्टेंबर पासून या टोलवाढी विरोधात मी आपल्यासाठी एक जन आंदोलन उभे करत आहे यात ठाणे करांचे सहकार्य मिळावे अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे.