विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : ठाण्याच्या उत्तरसभेत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या (Aurangabad) सभेची घोषणा केली. त्यानंतर मनसे कार्यकर्ते जोमानं कामाला लागले असले, तरी या सभेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांस्कृतिक मैदानातच सभा घेण्याचा मनसेचा हट्ट आहे. कार्यकर्त्यांनी मैदानात जाऊन व्यासपीठ पूजन करून कामही सुरू केलं आहे. निमंत्रण पत्रिकांचं वाटपही सुरू झालं आहे. याच मैदानात सभा घेण्यावर मनसे ठाम आहे.  राज ठाकरे यांच्या सभेचा टिझरही मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे. हिंदुत्वाची ठाकरी तोफ औरंगाबादेत धडकणार असून कार्यकर्त्यांना राजतिलकची तयारी करण्याचे आवाहन या टिझरमध्ये करण्यात आले आहे. सभेच्या जोरदार तयारीसाठी मनसे कार्यकर्त्यांकडून हे टीझर आता मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.


या टिझरच्या माध्यमातून नागरिकांना सभेला येण्याचं निमंत्रण मनसेकडून देण्यात आलं आहे. या टिझरला राज गर्जना असं नाव देण्यात आलं आहे. तसेच या टिझरमध्ये औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असा उल्लेख कऱण्यात आला आहे. 1 मे रोजी होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार? आणि कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 



तर राज ठाकरेंच्या मनसेच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात जमावबंदी लागू केल्याची चर्चा होती. मात्र पोलीस आयुक्तांनी शहरात कलम 144 लागू नसल्याचं स्पष्ट केलं आहे.  


आयुक्त असं सांगत असले तरी गृहमंत्री वळसे पाटलांनी मात्र अजूनही सभेच्या परवानीगबाबत सर्व पत्ते खुले केलेले नाहीत. परिस्थिती पाहून निर्णय घेणार असल्याचं सांगून मनसेला गॅसवर ठेवलंय. 


राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मेचा अल्टिमेटम दिलाय. त्याच्या दोनच दिवस आधी संवेदनशील असलेल्या औरंगाबादेत सभा होणार असल्यामुळे पोलीस अलर्टवर आहेत. त्यातच बाळासाहेबांच्या सभांनी गाजलेलं सांस्कृतिक मैदान मनसेला वापरू देण्यास शिवसेना राजी नसल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे सभेच्या परवानगीवरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.