Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्याच्या सभेसाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. औरंगाबादच्या क्रांती चौकात दाखल झाल्यानंतर त्यांचं मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचं औक्षण केलं. त्यांनंतर ते आपल्या मुक्कामस्थळी म्हणेज रामा इंटरनॅशनल हॉटेलकडे रवाना झाले.
नगरमध्येही मोठ्या जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं. नेवाशातही मोठ्या संख्येनं मनसैनिक उपस्थित होते. तिथं त्यांनी राज ठाकरेंचा सत्कार केला. अगदी हारतुरे, ढोलताशांसह रस्त्यारस्त्यावर राज ठाकरेंचा ताफा सत्कार स्विकारत पुढे जात होता.
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेसाठी जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. पुण्यात 100 पुरोहितांच्या मंत्रोच्चारात राज ठाकरे यांना आशीर्वाद देण्यात आला. राज यांना भगव्या रंगाची शाल देऊन, हार घालण्यात आला. राज यांच्या सभेसाठी आणि राजकीय यशासाठी 100 पुरोहितांनी आशीर्वादाचे मंत्रोच्चार केले. राज यांच्या कारवर पुष्पवृष्टीही करण्यात आली. राज ठाकरे आज सकाळी पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. त्याआधी आशीर्वादाचा हा सोहळा पार पडला.
राज ठाकरे यांच्या सभेची तयारी औरंगाबादमध्ये जोरात सुरू आहे. राज ठाकरेंच्या सभेचं स्टेज बांधून झालंय. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर होणा-या या सभेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. या सभेआधी पोलीस सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे. सभा उधळून देण्याचा इशारा काही संघटनांनी दिल्याने कोणताही धोका पत्करण्यास पोलीस तयार नाहीत.
पोलिसांनी डॉग स्क्वॉड, बॉम्ब शोधक पथक, मेटल डिटेक्टर पथक यांद्वारे कसून तपासणी केलीय. आता मनसेच्या मेळाव्याला अगदी काही तास उरले आहे. काऊंटडाऊन सुरू झालाय त्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे.