मनसेने शेअर केला अजित पवारांचा `तो` व्हिडीओ; त्यांच्याच विधानाची करुन दिली आठवण
MNS on Ajit Pawar: निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला (Ajit Pawar Faction) दिल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यादरम्यान मनसेने (MNS) अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला असून, त्यांच्या विधानाची आठवण करुन दिली आहे.
MNS on Ajit Pawar: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला (Ajit Pawar Faction) दिल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शरद पवार गटाने अजित पवार गटावर हल्लाबोल केला असून, राज्यभरात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात बॅनरबाजी केली आहे. यादरम्याने जुने व्हिडीओ, पोस्टही दोन्ही गटाकडून शेअर करत निशाणा साधला जात आहे.
निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात असताना अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आहे. मनसेने अजित पवारांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अजित पवार निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या बाजूने निर्णय दिल्यावर टीका करताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून मनसेने अजित पवारांना त्यांच्यात टीकेची आणि सध्याच्या परिस्थितीची आठवण करुन दिली आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करताना 'भुजां'मध्ये कितीही 'बळ' आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का? अशी विचारणा केली आहे.
व्हिडीओत अजित पवार काय म्हणाले आहेत?
"ज्याच्या वडिलांनी पक्ष काढला, वाढवला, महाराष्ट्रात सर्व दूरपर्यंत नेला त्यांचाच पक्ष, चिन्ह काढून घेतलं. जरी निवडणूक आयोगाने दिलं असलं तरी जनतेला पटल आहे का याचाही विचार करायला हवा. तुमच्यात धमक होती तर काढा ना पक्ष, कोणी अडवलं होतं?," असं अजित पवार या व्हिडीओत बोलताना ऐकू येत आहे. निवडणूक आयोगाने खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्याचा निर्णय दिल्यानंतर ही टीका करण्यात आली होती.
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनीही पत्रकार परिषदेत हा व्हिडीओ दाखवला होता. आम्हीही महापत्रकार परिषद घेणार आहोत. आमच्याकडेही व्हिडीओ आहेत. सगळं पुराव्यानिशी दाखवणार आहोत. आजपासून आम्ही जनतेत जाणार आहोत. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. निवडणूक आयोगाने कट रचून शरद पवारांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी अजित पवार आणि गँग कारणीभूत आहे असा आरोप त्यांनी केला.