पालघर : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं सर्वेक्षण टेम्बी खोडावे येथे आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. पालघरमध्ये आज बुलेट ट्रेनच्या सर्व्हेचं काम सुरु होतं. यावेळी मनसेचे माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हे काम बंद पाडलं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून आदेशवजा केलेले अवाहन मनसे कार्यकर्त्यांनी नुसते ऐकलेच नाही तर, ते मनावरही घेतले आहे. बुलेट ट्रेनबाबत मनसेची असलेली विरोधात्मक भूमिका जगजाहीर आहे. ही भूमिका किती कट्टर आहे, याची प्रचिती बुलेट ट्रेनचा सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा आली.


७ मेला देखील ठाण्यातील डावघर शीळ गावात असंच काम बंद पाडण्यात आलं होतं. मनसे कार्यकर्त्यांनी मनसेस्टाईल आंदोलन केलं. परिणामी सर्व्हे करण्यास आलेल्या या अधिकाऱ्यांना हा सर्व्हे थांबवावा लागला होता. त्यानंतर पोलिसांच्या सुरक्षेत हा सर्वे करण्यात आला. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस दल मागवण्यात आला होता.