मनसेत राजकीय भूकंप, १०७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजकीय भूकंप झालाय. संदीप मोझर यांच्या समर्थनार्थ जवळपास १०७ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेय. त्यामुळे साताऱ्यात मनसेत मोठी भूंकप झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे राजीनामे स्वीकारणार का, याचीच चर्चा सुरु आहे.
सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजकीय भूकंप झालाय. संदीप मोझर यांच्या समर्थनार्थ जवळपास १०७ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेय. त्यामुळे साताऱ्यात मनसेत मोठी भूंकप झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे राजीनामे स्वीकारणार का, याचीच चर्चा सुरु आहे.
राजीनामे राज ठाकरे यांना पाठवले
मनसेनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या १०७ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवले आहेत. रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांच्या अध्यक्षतेखाली रहिमतपूरमध्ये मंगळवारी एक बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आलाय.
नेत्यावर राजीनामा देण्याची वेळ
मनसेच्या पडत्या काळात पक्ष वाढवला. पश्चिम महाराष्ट्रात पक्ष जोमाने उभा करण्यासाठी काम केले. अनेक आंदोलने उभी करुन ती तडीस नेण्यासाठी त्यांनी तन, मन, धनाने अहोरात्र कष्ट घेतले. त्यामुळे पक्षाच्या एवढ्या मोठ्या नेत्यावर राजीनामा देण्याची वेळ येत असेल तर ही बाब संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यासाठी आणि एकूणच पक्षासाठी घातक आहे, अशी प्रतिक्रिया जनहित कक्षाचे जिल्हा संघटक मनोज माळी यांनी म्हटलेय.
हा प्रकार आमच्यासाठी अपमानास्पद
संदीप मोझर यांनी राजीनामा दिल्यामुळे आम्हीही पक्षत्याग करत आहोत. मोझर यांनी स्वत:हून अन्य सर्व पदाधिकऱ्यांनी पक्षातच राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरी त्यांनी निर्णय जाहीर करुन तीन दिवस उलटले तरी पक्षातील जबाबदार व वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत काहीच प्रतिक्रिया व्यक्त होत नाही. तसेच विचारणाही केली जात नाही. हा प्रकार आमच्यासाठी अपमानास्पद आहे, असे सांगत पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत.
प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकावर वासुदेव माने, मनोज माळी, बाळासाहेब बाबर, बाळकृष्ण पिसाळ, सुभाष चौधरी, सागर पवार, सागर केंजळे आदींसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.