मराठी महिलेला घर नाकारल्याने मनसे आक्रमक, मनसेचं थेट CM शिंदेंना पत्र; म्हणाले `कडक कायदा...`
मुलुंडमधील मराठी महिलेला जागा नाकारल्यानंतर या सगळ्या संदर्भात कडक कायदा करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेने यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रही लिहिलं आहे.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. यादरम्यान पीडित तृप्ती देवरुखकर या महिलेने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यातच आता मनसेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. मराठी माणसांना जागा नाकारणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कडक कायदा करा अशी मागणी त्यांनी केली आहे. 2016 मध्ये महापालिकेने यासंदर्भातील मंजूर केलेल्या प्रस्तावाचं नगर विकास विभागाने कायद्यात रूपांतर करावे अशी मनसेची मागणी आहे.
शिवसदन या सोसायटीमध्ये तृप्ती देवरुखकर यांना कार्यालयासाठी जागा हवी होती. मात्र मराठी लोकांना आम्ही जागा देत नाही अशी भूमिका तिथल्या सोसायटीमधील सचिवांनी घेतली होती. यावरून तृप्ती देवरुखकर आणि त्यांच्या पतीचा या सोसायटीतील सचिवाबरोबर वाद देखील झाला.
"जे लोक भाषेच्या, धर्माच्या, जातीच्या आणि खाण्या पिण्याच्या बाबतीत भेदभाव करून जागा नाकeरत असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. खरंतर या जैन, गुजराती सोसायटी राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भाजपा यांच्यामुळे तयार झाल्या. जेणेकरून त्यांना या सोसायटीमधून एकत्रित मतं मिळतील. आता ज्याप्रकारे मराठी माणसाला तिथे जागा किंवा घर नाकारले जात आहे हे चुकीच आहे," असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
"2016 मध्ये मुंबई महापालिकेने जे लोक भाषेच्या, धर्माच्या, जातीच्या, खाण्यापिण्याच्या बाबतीत भेदभाव करतात, याविरोधात एक प्रस्ताव मंजूर केला होता. अशा इमारतीची ओसी रद्द करण्यात यावी. आता हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रस्तावाचं कायद्यात रूपांतर करावे. अशा प्रकारचे प्रकार कुठल्या सोसायटीमध्ये घडले तर त्या सोसायटीचं डी-रजिस्ट्रेशन करून तिथे प्रशासक नेमावा," अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. अश्या विकासकांना भोगवटा प्रमाणपत्रदेखील देऊ नये असं ते म्हणाले आहेत.
पंकजा मुंडे यांना मराठी म्हणून घर नाकारलं हे त्यांनी खूप उशिरा सांगितलं. त्यांनी त्यावेळी सांगितलं असतं तर आम्ही पूर्णपणे त्यांच्यासोबत असतो. आता सुद्धा पंकजा मुंडे यांनी स्वतःला एकटं समजू नये. पक्ष बाजूला ठेवून या सगळ्या प्रकरणात आम्ही साथ देऊ आणि त्यांना जिथे हवा तिथे घर मिळवून देऊ," असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.
राज ठाकरेंचं ट्वीट
मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला.
हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे.
काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे.
अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे !