नागपुरमध्ये मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट; नऊ वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत
9 वर्षांचा चिराग मोबाईलच्या बॅटरीसह खेळत होता. यावेळी अचानक मोबाईल बॅटरीचा स्फोट होवून तो गंभीर जखमी झाला.
Mobile Battery Blast : पालकांना सावध करणारी घटना नागपुरमध्ये घडली आहे. मोबाईल बॅटरीशी खेळ करणं चिमुकल्याच्या जीवावर बेतलं असतं. मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होवून नऊ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बी बॅटरी कोणत्या मोबाईल कंपनीची होती. नेमका स्फोट कशामुळे झाला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरातील रेल्वे क्वार्टर परिसरात राहणारा चिराग बॅटरी घेऊन इलेकट्रीक सर्किट जोडण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा अचानक बॅटरीचा स्फोट झाला. बॅटरीचा स्फोट झाल्याने चिरागच्या डाव्या गालावर गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलं. सध्या चिरागची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होवून 6 वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी
रायगडच्या महाड तालुक्यातील आंबिवली गावात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होवून 6 वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. अनिता वाघमारे असं या मुलीचे नाव आहे. तिच्या तोंडाला दुखापत झाली होती. महाड येथील ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात हलवण्यात आलं होते.
मोबाईलच्या स्फोटात दहा वर्षांचा मुलगा जखमी
पुण्याच्या शिरूरमध्ये मोबाईलच्या स्फोटात दहा वर्षांचा मुलगा जखमी झाला होता. यात चिमुकल्याच्या डोळ्याला आणि पायाला गंभीर इजा पोहोचल्या होत्या. त्याच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मोबाईल शॉपीत मोबाईल बॅटरीचा स्फोट
साता-यातील कराड उंडाळे येथे एका मोबाईल शॉपीत मोबाईल बॅटरीचा स्फोट झाला होता. एक ग्राहक मोबाईल दुरुस्त करण्यासाठी गेला असताना हा प्रकार घडला होता. या घटनेचा थरार CCTV च्या कॅमेरात चित्रीत झाला होता. सदैवानं या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नव्हती.
मोबाईलची बॅटरी चार्जिंग करताना स्फोट होऊन आग लागली
नाशिकमधल्या निलगिरी बाग परिसरात डाळिंब मार्केटला भिषण आग लागली होती. या आगीत 7 ते 8 गाळ्यांमधील फ्रुट पॅकिंग साहित्य जळून खाक झाले होते. मोबाईलची बॅटरी चार्जिंग करताना स्फोट होऊन आग लागली होती. आगीत जीवित हानी झालेली नव्हती. मात्र, मोठं आर्थिक नुकसान झाले होते.
पँटच्या खिशातल्या मोबाईलने पेट घेतला
चंद्रपूरमधील बल्लारपूर शहरात एकाच्या पँटच्या खिशातल्या मोबाईलने अचानक पेट घेतला. हाताला गरम वाटू लागल्याने भाऊराव आस्वले यांनी मोबाईल बाहेर काढला. तेव्हा मोबाईलला आग लागल्याने त्यांनी तो फेकून दिला. त्याचवेळी त्याचा स्फोट झाला. सॅमसंग कंपनीचा हा मोबाईल भाऊराव आस्वले यांनी 4 वर्षांपूर्वी खरेदी केला होता.