तुमची कंपनी PF खात्यात नक्की पैसे जमा करते की नाही? `या` 3 टिप्स खूप कामाच्या!
PF Balance Check: अनेकदा अशा काही तक्रारी समोर येतात ज्यामध्ये कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कापते पण पीएफ खात्यात जमा करत नाही.
PF Balance Check: नोकरी करत असाल तर तुमचं एक पीएफ खातं नक्की असेल. जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO द्वारे चालवले जाते. कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते बचत योजना म्हणून काम करत असतं. दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 12% रक्कम या खात्यात जमा केली जाते आणि कंपनी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यातही तेवढीच रक्कम जमा करते. म्हणजेच कर्मचारी आणि कंपनी दोघेही दर महिन्याला पीएफ खात्यात योगदान देतात. या खात्यात जमा झालेल्या रकमेवर सरकार व्याजही देते. अनेकदा अशा काही तक्रारी समोर येतात ज्यामध्ये कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कापते पण पीएफ खात्यात जमा करत नाही. त्यामुळे तुमची कंपनी तुमच्या पगारातून पीएफच्या नावावर जे पैसे कापत आहे, ते पैसेही नक्की तुमच्या पीएफ फंडात जमा होत आहेत की नाही? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होणं साहजिकच आहे. पण यासाठी काळजी करु नका. काही मिनिटांत तुम्ही हे शोधू शकता. यासाठी 3 सोप्या टिप्स जाणून घेऊया.
पीएफ ऑनलाइन कसा तपासायचा?
पीएफ शिल्लक तपासण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करु शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला EPFO सदस्य पासबुक पोर्टलवर जावे लागेल. नंतर तुमच्या UAN नंबरच्या मदतीने पोर्टलवर लॉग इन करा. या पोर्टलवर पहिल्यांदाच जात असाल तर तुम्हाला प्रथम तुमचा UAN क्रमांक सक्रिय करावा लागेल. आता तुम्हाला ज्या पीएफ खात्याची शिल्लक तपासायची आहे ते निवडा आणि त्यावर क्लिक करा. तुम्ही हे केल्यावर तुमच्या खात्याचा संपूर्ण तपशील तुमच्यासमोर येईल.
पीएफ एसएमएसद्वारे कसा तपासायचा?
तुम्ही एसएमएस पाठवून तुमचा पीएफ शिल्लक तपासू शकता. तुमच्या फोनच्या मदतीने तुम्ही फक्त एक टेक्स्ट मेसेज पाठवून तुमचा PF शिल्लक सहज तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या मेसेज बॉक्समध्ये 12 अंकी "EPFOHO UAN" लिहावे लागेल आणि ते 7738299899 वर पाठवावे लागेल. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुनच हा मेसेज पाठवावा. तुमचा UAN क्रमांक सक्रिय आहे का, हे तपासून घ्या.
पीएफ ॲपद्वारेद्वारे कसा तपासायचा?
उमंग ॲपवर तुम्हाला पीएफशी संबंधित अनेक माहिती मिळेल. यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. सर्वप्रथम उमंग ॲपवर जा आणि EPFO विभागावर क्लिक करा. नंतर तुमच्या UAN नंबरच्या मदतीने पोर्टलवर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमची पीएफ शिल्लक आणि खात्याशी संबंधित इतर अनेक माहिती मिळवू शकता.