राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय... `या` ठिकाणी ऑरेंज अलर्ट
मान्सूनबाबत अतिशय महत्त्वाची बातमी..., `या` शहरांमध्ये ऑरेंज अलर्ट
मुंबई : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलाय. मुसळधार पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचं बहुतांश ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे शेतकऱ्यांसाठी आणखी पुढील 3 दिवस हे वैऱ्याचे आहेत. राज्यात कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात 9 ऑगस्टपर्यंत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलाय. शिवाय या भागात अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. दरम्यान उर्वरित भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय मांजरम आणि लोहा तालुक्यातील उमरा भागात मुसळधार पावसामुळे कहाळा, पाटोदा, ममण्याळ, बरबडा भागात नाल्यांना पूर आला. यामुळे या भागातील शेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. तात्काळ पंचनामे करून पिकविमा मिळवून देण्याची मागणी येथील शेतकरी करताहेत
बीड जिल्ह्यातच ढगफुटीसदृश पाऊश झालाय. त्यामुळे शेतक-याचं प्रचंड नुकसान झालंय. रात्री परळी तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पांगरी लिंबोटा तळेगाव या गावातील भागात तर ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीये.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडनदीला पूर आला...जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या गडनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागात पुराचे पाणी घुसलं आहे. कणकवली आचरा मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला. तर माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला महापूर आल्याने कुडाळ तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटलाय आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा 85 टक्के भरलंय. धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाच्या कॅचमेंट परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्यानं पाण्याची आवक वाढलीय. पाणीपातळी संतुलित राहावी यासाठी धरणाचे तीन दरवाजे खुले करण्यात आलेत.
वाशिम जिल्ह्यात मागील 5 दिवसापासून पावसांनी जोरदार हजेरी लावली. मालेगाव तालुक्यातील राजुरा, सुकांडा, खैरखेडा, अमानवाडी परिसरात ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली. अतिपावसामुळे पिकांसह शेतकऱ्याची जमीन खरडून गेली. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतीचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.
सिंधुदुर्गात रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा फटका कणकवली तालुक्यातील बावशी गावातील दशरथ मर्ये यांच्या कुटुंबाला बसलाय...सततच्या पावसामुळे मर्येंचं घर कोसळलंय...दैव बलवत्तर म्हणून मोठ्या संकटातून हे कुटुंब बचावलंय...या घरात लहान मुलगी आणि तिची आजी होती...मोठा आवाज येताच दशरथ मर्ये धावत त्या खोलीत आले आणि त्यांनी मुलीला आजीला बाहेर काढलं.