पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, शेतकऱ्यांनी कधी पेरणीला सुरुवात करावी?
Maharashtra Weather Updates: राज्यात मान्सून सक्रीय झाला. मात्र, मान्सूला अद्याप जोर दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहेत. पेरणीसाठी शेतकऱ्याला वाट पाहावी लागत आहे. मान्सून लांबल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे.
Maharashtra Mansoon Updates : शेतकऱ्यांसह सर्व सामान्य पावसाकडे डोळे लावून आहेत. मान्सून लांबल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. सगळेच उकाड्याने हैराण झाले आहेत. राज्यात मान्सून 26 जूननंतर सक्रीय होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांची सुटका या आठवडाखेरीस उत्तर होण्याची शक्यता आहे. 23 आणि 24 जूननंतर अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. तसा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पावसासाठी आणखी एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे.
आठवड्यानंतर पाऊस अधिक सक्रीय
अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळाल्यानंतर या वाऱ्यांची उंचीही वाढत आहे. त्यामुळे मध्य भारतातील अनेक भागात मान्सून बरसेल. हा मान्सून राज्यातही अधिक सक्रीय होईल. आठवड्यानंतर पाऊस अधिक सक्रीय झाल्यानंतर उकाड्यातूनही सगळ्यांची सुटका होण्याची आशा आहे. मुंबईचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. मुंबईत या आठवड्याची सुरुवात प्रचंड उकाड्याने झाली. कुलाबा येथे 33.7 तर सांताक्रूझ येथे 33.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा 2.2 अंशांनी अधिक होते.
दरम्यान, जून महिनाच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांमध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात जोरदार पाऊस पडेल, अशी माहिती हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. पावसासाठी चांगली स्थिती आहे. पाऊस गायब असल्याने सध्या पावसाची सरासरी ही मोठ्या प्रमाणावर तुटीची आहे.
शेतकरी मोठ्या चिंतेत
20 जून उजाडला तरी देखील राज्यात पावसाचा थेंब पडताना दिसत नाहीये. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यत पेरण्या आटोपून शेतकरी मान्सूनची वाट पाहतायत. पण पाऊस नसल्याने पेरलेले उगवेल का? असा प्रश्न शेतक-यांना सतावतोय. पाऊस लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. शेतीची कामे खोळंबली आहेत. पावसा अभावी पेरणी करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांनी आता पेरणी करु नये, असे आवाहन करण्यात आली आहे. पावसाची थोडी वाट पाहा आणि नंतर शेतीची पेरणी करावी. पेरणीसाठी घाई करु नये, असाही सल्ला देण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या भागामध्ये 70 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणीयोग्य वातावरण निर्माण होते. त्यानंतर पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे पाणीची समस्या भेडसावणार आहे. अनेक धरणातील पाणीसाठा संपत आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातही पाणीसाठा कमी झालाय. तसेच काही टीएमसीच्या धरणात काहीअंशी पाणीसाठा शिल्लक आहे.