महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट?; सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या `या` तालुक्यात पावसाची पाठ
Maharashtra Draught Situation: मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने महिनाभर दडी मारली आहे. त्यामुळं जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद झाले असून खरीप पिकांनी माना टाकत शेवटच्या घटका मोजत आहेत.
चैत्राली राजपूरकर, झी मीडीया
Maharashtra Rain Update: ऑगस्ट महिन्यात (August Rain) पावसाने ओढ दिल्यामुळं मराठवाडा व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने 122 वर्षातील कोरडा ऑगस्ट ठरला आहे. पाऊस नसल्याने शेतकरीही चिंतातूर झाला आहे तर, धरणातही पाणीसाठा नाहीये. विक्रमी पाऊस असणाऱ्या मावळ मध्ये पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळं पवना धरण क्षेत्रात शून्य टक्के पाऊस झाला आहे तर लोणावळ्यात केवळ 3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पावसाने दडी मारल्याने यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. आत्तापासून पिण्याच्या पाण्यासाठी व पिकांसाठी टँकर मागवावे लागत आहेत. मराठवाड्यात 534 मंडळांपैकी तब्बल 103 मंडळांमध्ये पावसाने 21 पेक्षा जास्त दिवसांचा खंड दिला आहे. त्यामुळं पिकांना याचा फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या, जवळपास एक ते दीड महिना उशिरा या पेरण्या करण्यात आल्या, मात्र त्यानंतर ही अद्याप पर्यंत समाधानकारक पाऊस नसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होतेय. मावळ प्रांतातही पावसाने ऑगस्ट महिन्यात ओढ दिल्याने चिंता व्यक्त होत आहे. जुलैमध्ये मावळ प्रांतात विक्रमी पाऊस झाला होता. मात्र, या महिन्यात पावसाने दडी मारली आहे.
सर्वात जास्त पर्जन्यमान असलेल्या मावळ तालुक्यात पावसाने पुन्हा पाठ फिरवली आहे. ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊसच झाला नसल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 24 तासांत संपूर्ण मावळ आणि पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शून्य पावसाची नोंद तर गेल्या 24 तासांत तालुक्यात फक्त 3 मिलिमीटर पाऊस लोणावळ्यात झाला आहे. परंतु महिनाभर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पवना धरणासह मावळ तालुक्यातील अनेक धरणांनी शंभरी गाठली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी आणि सिंचनाचा प्रश्न तूर्तास सुटला आहे.
गेल्या 24 तासांत परिसरात पावसाची आकडेवारी
वडगांव - 0.00 मि.मी
तळेगांव - 0.00 मि.मी
खडकाळा - 0.00 मि.मी
लोणावळा -3.00 मि.मी
शिवणे - 0.00 मि.मी
अल निनोचा प्रभाव
आयएमडी अर्थात भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी अल निनोचा प्रभाव जास्त दिसून आला. 1901 नंतरचा म्हणजे गेल्या 122 वर्षांमधील सर्वात कोरडा ऑगस्ट महिना अशी या महिन्याची नोंदही करण्यात आली आहे. त्यामुळं सरासरीपेक्षा 13 टक्के कमी पर्जन्यमानानं सर्वांच्याच चिंतेत भर टाकली. येत्या काळातही पाऊस कमी पडल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.