Monsoon Updates : मुंबईसह अर्धा महाराष्ट्र पावसानं ओलाचिंब; राज्यावर काळ्या ढगांची चादर
रात्रीच्या सुमारास पावसाचा जोरही वाढला
मुंबई : सोमवारी संध्याकाळपासून मुंबईत पावसानं चांगलाच जोर धरला. रात्रीच्या सुमारास पावसाचा जोरही वाढला. सद्यस्थिती पाहता राज्यात मान्सून चांगलाच स्थिरावला आहे, ही बाब आता नाकारता येत नाही. (monsoon rain wipes out konkan Mumbai maharashtra updates)
मुंबई पावसानं ओलीचिंब झालेली असतानाच इथं रेल्वे सेवांवर याचे परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. पश्चिम रेल्वे सुरळीत सुरु आहे, तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवरील प्रवास 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरु आहे. परिणामी नोकरीसाठी निघायचं झाल्यास पावसाच्या या दिवसांमध्ये काहीसे वेळेआधीच निघणं योग्य ठरणार आहे.
कोकणही ओलाचिंब
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. गेले काही दिवस लपंडाव करणारा पाऊस सोमवारी सिंधुदुर्गात मुसळधार कोसळला. तळ कोकणातील शेतकरी पेरणीची कामे आटोपून लावणीपूर्व कामाच्या तयारीला लागले आहेत. त्यात जोरदार पाऊस झाल्यानं बळीराजा सुखावला आहे. मंगळवारची सुरुवातही या भागात पावसानंच झाली.
नागपुरात वादळी वाऱ्यासह पाऊस
नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. सुरुवातीच्याच पावसामुळं येथील सखल भागांत पाणी साचलं. तर नरेंद्रनगर रेल्वे ब्रिज खालील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
तिथे चंद्रपुरात 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जलधारा बरसल्या. 7 जूनपासून जिल्ह्यात केवळ एकदाच समाधानकारक पाऊस पडला होता. पावसाच्या आगमनाने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. पावसामुळे शहरातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान बळीराजाला मात्र पेरण्यांसाठी अजून मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.