महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू, पण `या` जिल्ह्यांत मात्र पावसाचा इशारा, कसं असेल राज्याचं हवामान?
Maharashtra Weather Update: राज्यात मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं उकाड्यात वाढ झाली आहे.
Maharashtra Weather Update: राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. तर एकीकडे उन्हाच्या झळा वाढण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर हीटमुळं मुंबईकर त्रस्त झाले आहेत. मुंबईकरांची येत्या काळात उकाड्यापासून सुटका होणे दूरच याउलट उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत पुढील तीन – चार दिवस कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात पावसाने मुंबई व राज्यभरात धुमाकुळ घातला होता. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून राज्यात उकाडा वाढला आहे. वाढत्या आद्रतेमुळं उकाड्यात आणखी वाढ होत आहे. पुढील चार ते पाच दिवस मुंबईचे तापमान 33 ते 36 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवस पावसाच्या हलकी सरी बरसू शकतात, अशी शक्यताही प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईबरोबरच राज्यातील इतर काही भागातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी (६ ऑक्टोबर) संपूर्ण कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातून शनिवारी मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. पावसाची उघडीप असलेल्या ठिकाणी उकाड्यात वाढ झाली आहे. ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवायला लागला आहे. मात्र, यंदा थंडीही लवकर पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राजस्थानमधून सरासरीपेक्षा सात दिवस उशिराने परतीचा प्रवास सुरू करणाऱ्या मोसमी पावसाने महाराष्ट्रातून मात्र नियोजित वेळेत परतीचा प्रवास सुरू केला आहे. शनिवारी (५ ऑक्टोबर) नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मोसमी पाऊस माघारी फिरला आहे. हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेत म्हणजे १० ऑक्टोबरपर्यंत मोसमी वारे राज्यातून माघारी परतण्याचा अंदाज आहे. पोषक हवामान राहिल्यास १० ऑक्टोबरपर्यंत माघारीचा प्रवास पूर्ण होण्याचा अंदाज आहे. अगदीच माघारीचा प्रवास लांबला तर १५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मोसमी पाऊस पूर्णपणे माघारी जाण्याचा अंदाज आहे.