मान्सून गोव्याच्या वेशीवर, ४८ तासात महाराष्ट्रात कोसळणार
मान्सूनची प्रगती चांगली सुरु आहे. पुढील ४८ तासात महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होण्याचे संकेत मिळाले आहेत.
मुंबई : मान्सूनची प्रगती चांगली सुरु आहे. मान्सूनने केरळची सीमा ओलांडून गोव्यात प्रवेश केलाय. आता कोकणकडे कूच करण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासात महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे उद्यापासून पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, गोव्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पहिले दोन दिवस सर्वत्र मूसळधार पाऊस होणार होईल. त्यानंतर पुढचे तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
मान्सून केरळमध्ये वेळेआधी पोहोचलाय. कारवारच्या वेशीवर रेंगाळलेला मान्सून उद्या म्हणजेच गुरुवारी गोव्यात दाखल होणार आहे. उद्यापासून पुढचे ५ दिवस मुसळधार पाऊस होईल असा अंदाज गोवा वेधशाळेचे संचालक एम. एल.साहू यांनी व्यक्त केलाय. नियोजित वेळेनुसार मान्सून ६ जून रोजी गोव्यात दाखल होतो. मात्र मान्सून रेंगाळलाय. मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळेच गोव्यात आणि दक्षिण कोकणात उद्या मान्सून दाखल होईल असे वृत्त गोवा वेधशाळेने दिलेय.
२८ मे रोजी वेळेआधी केरळमध्ये पोहचलेला मान्सून त्याच वेगाने गोव्याच्या वेशीवर असलेल्या कर्नाटकमधील कारवारपर्यंत अवघ्या २४ तासात पोहोचला होता. मात्र त्यानंतर मान्सूनची गती कमी झाल्याने तो पुढे सरकू शकला नव्हता. आता मान्सून पुढे सरकण्यासाठी आवश्यक असलेले पश्चिमी वारे जोर धरु लागले आहेत. त्यामुळेच उद्यापासून मान्सून गोव्याबरोबर कोकणात दाखल होईल असा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे.