Monsoon Update: राज्यभरात अखेर पाऊस सक्रीय झाला असून अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. पण जून महिना संपताना पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांना मात्र फार वेळ वाट पाहावी लागली. जवळपास अर्धा जून महिना बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. दरम्यान, आता पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असताना सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मात्र भार पडताना दिसत आहे. याचं कारण पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबीरला चक्क 170 रुपये प्रति जोडी भाव मिळाला आहे. गेल्या 24 तासात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने भाज्यांची आवक निम्म्याने घटली आहे. याचा परिणाम कोथिंबीरवर झाला आहे. कोथिंबीरीच्या जोडीचा शेकडा भाव 12 ते 17 हजारांपर्यंत गेला आहे.


गेल्या आठवड्यापर्यंत कोथिंबीरचा दर 40 ते 50 रुपये जोडी होता. दरम्यान कोथिंबीरसह शेपूची जोडी 35 ते 40 रुपयांवर गेली आहे. तसंच पालक 20 रुपये तर टोमॅटो 50 ते 70 रुपये किलो झाला आहे. 


टोमॅटोही महागला


टोमॅटोचे दर होलसेल मार्केटमध्ये 50 ते 55 रुपये किलो असले तरीही भाजीवाल्यांकडे येईपर्यंत हे दर 80 ते 100 रुपे प्रती किलो इतक्या स्तरावर पोहोचले आहेत. फरसवी, घेवडा, मिरची, हिरवा वाटाणा (मटार) या भाज्यांचे दरही 30 - 40 रुपये पाव इतके झाल्याची माहिती मिळत आहे. 


कृषी उत्पन्न बाजार समितीतून समोर आलेल्या माहितीनुसार इथं दर सोमवारी साधारण 600 ट्रक भाजीपाला घेऊन दाखल होतात. पण, जून महिन्यातील अखेरच्या आठवड्याच्या सोमवारी मात्र 467 ट्रकच इथं दाखल झाले. त्यातही पावसामुळं किमान 10 ते 20 टक्के मालाचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळं या नासाडीची नुकसानभरपाई भाजीपाल्याच्या वाढीव दरातून आकारली जात आहे. टोमॅटो आणि मिरचीबाबत सांगावं तर, दर दुसऱ्या पदार्थामध्ये वापरली जाणारे हे जिन्नसही शंभरीपार पोहोचले आहेत. होलसेल बाजारात मिरचीचे जर 45 ते 55 रुपये किलो इतके आहेत. तर, किरकोळ बाजारात हेच दर 120 रुपये प्रती किलो इतका आकडा गाठत आहेत. त्यामुळं अनेकांच्याच जेवणातून तूर्तास टोमॅटो, मिरचीही गायब होताना दिसतेय.


रताळी आवक वाढल्याने माल पडून, शेतकरी हवालदिल


गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आवक झाल्याने रताळ्याच्या भावात थोडी घट झाली आहे. रताळ्यास प्रतिकिलो 10 ते 12 रुपये आणि स्थानिक रताळ्यास प्रतिकिलो 12 ते 15 रुपये इतका भाव मिळत आहे. एकादशीच्या उपवासाकरिता मार्केट यार्ड येथील बाजारात रताळ्याची आवक वाढली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेतमाल मार्केटमध्ये सोडूनच अनेक शेतकरी गावी परतले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रताळी लागवड केली होती.