Monsoon Updates : काही क्षणांची उसंत घेतल्यानंतर सोमवारपासून पावसानं पुन्हा जोर धरला. ठाणे, मुंबईत सोमवारी रात्रभर जोरदार पाऊस झाला. परिणामी सखल भागात साचलं पाणी हवामान विभागाकडून मुंबईसह उपनगरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Monsoon updates thane mumbai konkan orange alert IMD NDRF)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिथं कोकणातही मुसळधार पाऊस सुरू आहे. दक्षिण कोकण आणि गोवा भागात सकाळपासून पाऊस आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस होत असल्याची नोंद करण्यात आली आहे. 


रत्नागिरीतील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत. कोकणात पुढील काही तास मध्यम ते तीव्र सरींची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत आहे. कोल्हापूरातही जोरदार पाऊस सुरु असल्यामुळं पंचगंगेची पातळी वाढली आहे. 


मुसळधार पावसामुळं बर्की धबधबा प्रवाहित झाला. पण, तिथं बंधाऱ्यात काही पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली. बचाव कार्याच्या सहाय्यानं अखेर या 50 ते 60 पर्यतकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. 


दरम्यान, राज्यातील पावसासंदर्भात हवामान खात्यानं दिलेला हा इशारा पाहता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचे निर्देश दिले आहेत. 


कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा थोडी कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वरून वाहात आहे. या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणं, तसंच जीवितहानी होऊ न देणं यासाठी मुख्यमंत्र्यांनी खबरदारीचे निर्देश दिले आहेत. 


रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या पावसाचा फटका चिपळूण तालुक्याला बसला आहे. सध्या संपूर्ण चिपळूण शहर जलमय झालं आहे.. चिपळूण शहरातील मुंबई-गोवा महामार्गाला नदीचं रूप आलं. मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचं काम सुरू आहे त्या ठिकाणी अक्षरशः नदी झालेली पाहायला मिळाली.



इथे मुंबई आणि नवी मुंबईसुद्धा ओलिचिंब झाली आहे. नवी मुंबईत मुसळधार पावसानं खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात पाणी साचलं. यामुळे प्रवाशांचे पुरते हाल झाले. साचलेल्या पाण्यातून प्रवाशांना मार्ग काढताना कसरत करावी लागली.