आनंदाची बातमी ! मुंबईसह महाराष्ट्रासाठी मान्सून वीकेंड
पुढच्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार
मुंबई : मान्सून महाराष्ट्रात गुरुवारी पोहचला. आज तो आणखी थोडा पुढे सरकला आहे. रत्नागिरीच्या हर्णे पर्यंत मान्सून पोहचला आहे आणि आज त्याचा मुक्काम तेथेच आहे. मराठवाड्यात बीडमध्ये मान्सून दाखल झाला आहे. पुढच्या ४८ तासांत उर्वरित महाराष्ट्रानं मान्सूनच्या स्वागतासाठी तयार राहावं, कारण दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे. यावेळी मुंबईसह महाराष्ट्राचा विकेंड मान्सूनने चिंब भिजवणारा असेल.
पुढच्या ४८ तासांत मान्सून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. मान्सून पुढे जाण्यासाठी वातावरण अनुकूल असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी शुक्रवारी दिली.
मान्सून गुरुवारी महाराष्ट्रात तळकोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात दाखल झाला. म्हणजे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यात गुरुवारी मान्सूनने हजेरी लावली आणि गेल्या २४ तासांत कोकणसह मराठवाड्यातही चांगला पाऊस झाला.
कोकणच्या काही भागात सध्या मान्सून चांगला बरसत आहे. सिंधुदुर्गच्या काही भागात १४० मिमी पावसाची नोंद झाली. मालवणमध्ये १५८ मिमी पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये ११५ मिमी पाऊस झाला. बीडमध्ये ६२ मिमी, तर नांदेडच्या मुखेडमध्ये ६१ मिमी. इतका पाऊस झाला. याशिवाय लातूर जिल्ह्यातील उद्गीरमध्येही चांगला पाऊस झाला.
मान्सूनच्या आगमनानंतर कोकणासह महाराष्ट्रात खरीप हंगामाच्या कामांना वेग येईल. कोकणात भातशेतीची पेरणी आधीच झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाबरोबर अनेक ठिकाणी पाण्याचे स्त्रोत जिवंत झाले आणि ओढे-ओहोळ पाण्याने वाहू लागले आहेत. आणखी जोरदार पाऊस कोसळला की कोकणात धबधबेही कोसळू लागतील.