कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनचा फटका यंदा गणपती व्यावसायिकांना बसला आहे. कोरोनामुळे यावर्षी गणेश मंडळांनीदेखील छोट्या छोट्या शाडूच्या मुर्त्या घेण्याला पसंती दर्शवली आहे. ज्या मंडळांकडून दरवर्षी मोठं-मोठया मूर्ती घेतल्या जात होत्या त्याच मंडळांकडून यंदा लहान मूर्तींसाठी नोंदणी होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे घरच्या गणेशोत्सोवासाठीही नागरिक शाडूच्या मातीची गणेश मूर्ती घेत असल्याचं चित्र आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरच्या गणपतीसाठी एक फुटापेक्षा लहान मुर्त्यांची मागणी अधिक आहे. कोरोनाचं सावट आणखी किती महिने राहणार हे सांगता येत नाही. त्यामुळे शाडूच्या मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करता यावे हा त्यामागचा उद्देश दिसत आहे. विसर्जन ठिकाणी मोठी गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येतं नाही. त्यामुळे छोट्या मुर्त्यांची मागणी वाढली आहे. मात्र शाडूच्या मातीच्या किंमतीत वाढ झाली आहे. कारागिरांनाही गणपतीची मूर्ती बनवायला वेळ खूप जात असल्याने मूर्तींच्या किमती वीस ते तीस टक्क्यांनी वाढल्या आहेत.


दरम्यान, कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुक केलेल्या गणेश मूर्तींच्या ऑर्डर रद्द होत असल्याने कल्याणमधील मूर्तिकार संकटात सापडले आहेत. कल्याण डोंबिवलीतील कोरोनाचे वेगाने वाढणारे रुग्ण तसंच संसर्ग होण्याच्या भीतीने मुंबईतील अनेक मंडळांनी आपल्या ऑर्डर रद्द केल्याची माहिती इथल्या मूर्तिकारांनी दिली. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यंदा सार्वजनिक गणेशमंडळांमध्ये गणेश मुर्तीची जास्तीत जास्त उंची चार फुट असावी असं सांगितलं आहे. तसंच गणेश आगमनाची मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूकही होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.