Lockdown Side effect : भारतात 10 हजाराहून अधिक कंपन्या बंद....महाराष्ट्राचा कितवा क्रमांक?
एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 मध्ये हजारो कंपन्यांना टाळं
मुंबई : एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत भारतात 10 हजार 113 कंपन्यांना टाळं ठोकण्याची वेळ आली आहे. कंपनी व्यवहार खात्याचे मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. या आकडेवारीत महाराष्ट्राचा क्रमांक चौथा आहे. दिल्लीमध्ये सर्वाधिक 2 हजार 394, उत्तर प्रदेशात 1 हजार 936, तामिळनाडूत 1 हजार 322 आणि महाराष्ट्रात 1 हजार 279 कंपन्या बंद पडल्या. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या कंपन्या बंद करण्याची वेळ आली.
आश्चर्याची बाब म्हणजे गुजरातमध्ये हा आक़डा केवळ 17 आहे. तर अंदमान निकोबारमध्ये 2 आणि पश्चिम बंगालमध्ये 4 असा सर्वात कमी आकडा या राज्यांमध्ये आहे.
कोणत्या राज्यात किती कंपन्या बंद पडल्या?
राज्य कंपन्या बंद
दिल्ली 2 हजार 394
उत्तर प्रदेश 1 हजार 936
तामिळनाडू 1 हजार 322
महाराष्ट्र 1 हजार 279
कर्नाटक 836
चंदीगड 501
राजस्थान 479
तेलंगणा 404
केरळ 307
झारखंड 137
मध्य प्रदेश 111
बिहार 104
मेघालय 88
ओडीशा 78
छत्तीसगड 47
गोवा 36
पुदूच्चेरी 31
गुजरात 17
पश्चिम बंगाल 04
अंदमान निकोबार 02
25 मार्चपासून भारतात लॉकडाऊनला सुरूवात झाली. जूनपर्यंत भारतात कडेकोटपणे लॉकडाऊन लावण्यात आलेलं. बंद वाहतूक व्यवस्था आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे कार्यालयं गाठणं कर्मचाऱ्यांसाठी शक्य नव्हतं. अनेकांनी यावेळी वर्क फ्रॉम होम केलं. तर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ऑफीसेसमध्ये जाऊन काम करत होते. या सगळ्याचा आणि आर्थिक फटका बसल्यामुळे भारतात 10 हजार 113 कंपन्यांवर कामकाज बंद करण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे कोरोना आणि लॉकडाऊनचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर किती विपरित परिणाम झाला असेल, हेच यावरून दिसून येतं.