राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, १९८ जणांचा मृत्यू
मागच्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे ५,५३७ नवे रुग्ण आढळले आहेत.
मुंबई : मागच्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे ५,५३७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १९८ जणांचा मृत्यू झाला आहे. यातले ६९ मृत्यू मागच्या ४८ तासातील आहेत, तर उरलेले १२९ मृत्यू हे मागच्या कालावधीतील आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ८,०५३ एवढी झाली आहे. तर एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १,८०,२९८ एवढे आहेत.
राज्यातल्या १,८०,२९८ कोरोनाग्रस्तांपैकी ७९,०७५ रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत, तर ९३,१५४ जणांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागच्या २४ तासात २,२४३ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातलं कोरोनाग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण ५१.६७ टक्के एवढं झालं आहे. तर राज्यातला मृत्यूदर ४.४७ टक्के एवढा आहे.
राज्यात आत्तापर्यंत ९,९२,७२३ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली, यापैकी १,८०,२९८ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. म्हणजेच राज्यातल्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह यायचं प्रमाण १८.१६ टक्के एवढं आहे.