पुण्यात मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांना पोलिसांनी असा शिकवला धडा
कोरोनामुळे चिंता वाढत आहे. देशात लॉकडाऊन-२ लागू करण्यात आले आहे. असे असताना मॉर्निंगवॉक.
पुणे :कोरोनामुळे चिंता वाढत आहे. देशात लॉकडाऊन-२ लागू करण्यात आले आहे. तसेच संचारबंदी जारी आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रत्येकांने घरात राहावे, बाहेर पडू नये, असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही अनेकजण याचे उल्लंघन करताना दिसत आहे. शहरात मॉर्निंगवॉकला निघालेल्या पुणेकरांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला. भर रस्त्यात योगासने करायला लावलीत. हा प्रकार बिबवे वाडी येथे घडला.
पुण्यात लॉकडाऊनचं उल्लंघन करून मॉर्निंगवॉकला जाणाऱ्या या नागरिकांना पोलिसांनी चक्क रस्त्यातच योगा करायला लावला. काही ठिकाणी त्यांना उठाबशा काढायला लावल्या. जवळजवळ तीन ते चार तास त्यांना थांबवून घेतल्यानंतर त्यांची सुटका झाली.
पुण्यातील कोंढवा, हडपसर, बिबवेवाडी, स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई झाली. लॉकडाऊन गांभीर्यानं घ्या, आरोग्याची काळजी घ्या, घरीच व्यायाम करा, असं वारंवार सांगूनही नागरिक त्याचं पालन करताना दिसत नाही. त्यामुळे आता पोलिसांनी ही नामी शक्कल लढवली असल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे.